क्वेटा,
32 dead in Balochistan mine accident पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात कोळसा खाणीत झालेल्या भीषण दुर्घटनेत ३२ कामगारांचा मृत्यू झाला असून, दोन जणांचा अद्याप शोध सुरू आहे. क्वेट्टाजवळील सोरांगे कोळसा क्षेत्रातील दोन खाजगी खाणींमध्ये मिथेन वायूचा स्फोट झाल्यानंतर भीषण आग लागली आणि खाणींचा काही भाग कोसळल्याने ही दुर्घटना घडली. मिथेन वायूची मोठ्या प्रमाणातील उपस्थिती आणि आगीमुळे बचावकार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

वृत्तानुसार, हा अपघात क्वेट्टाच्या ईशान्येस सुमारे ३० किलोमीटरवरील सोरांगे कोळसा क्षेत्रात गुरुवारी घडला. पहिल्या खाणीत मिथेन वायूचा स्फोट झाल्यानंतर आग लागली आणि खाणीचा मोठा भाग कोसळला. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की त्याचा परिणाम जवळील दुसऱ्या कोळसा खाणीवरही झाला आणि तेथील कामगारही या दुर्घटनेत अडकले.बलुचिस्तानचे मुख्य खाण निरीक्षक मोहम्मद आतिफ यांनी सांगितले की, अपघाताच्या वेळी दोन्ही खाणींमध्ये एकूण ३४ कामगार काम करत होते. आतापर्यंत ३२ कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, स्फोट झालेल्या खाणीतून दोन कामगार अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पहिल्या खाणीत सुमारे २४ कामगार जवळपास ४,००० फूट खोलीवर काम करत असताना स्फोट झाला. त्यानंतर तात्काळ आग लागली आणि खाणीचे अनेक भाग कोसळले. स्फोटाचा आवाज संपूर्ण सोरांगे परिसरात दूरवर ऐकू आल्याचे सांगण्यात आले. दुसऱ्या खाणीत त्या वेळी १२ कामगार कार्यरत होते आणि स्फोटाचा फटका त्यांनाही बसला.बचावकार्य वेगाने करण्यासाठी अभियंते आणि बचाव पथकांनी पर्यायी मार्ग तयार केले आहेत. मात्र खाणीत साचलेला मिथेन वायू आणि धगधगती आग यामुळे अडकलेल्या कामगारांपर्यंत तसेच मृतदेहांपर्यंत पोहोचणे अत्यंत कठीण ठरत आहे. दरम्यान, पाकिस्तानमध्ये अलीकडच्या काळात खाण दुर्घटनांचे प्रमाण वाढले आहे. जून महिन्यात क्वेटा विभागातील खानोझाई येथे स्फोटकांच्या स्फोटात तीन जण जखमी झाले होते, तर एप्रिलमध्ये बोलान जिल्ह्यातील कोळसा खाण दुर्घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाला होता.