रावळकोट,
50 deaths in Pakistan-occupied Kashmir पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनांदरम्यान सुरक्षा दलांच्या कारवाईवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. जम्मू आणि काश्मीर संयुक्त जन कृती समिती (JAAC)चे सदस्य सरदार उमर नझीर काश्मिरी यांनी सोशल मीडियावर दावा करताना सांगितले की, सुरक्षा दलांच्या कारवाईत आतापर्यंत ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो जण जखमी झाले आहेत. त्यांनी या कारवाईला अमानुष स्वरूपाचे असल्याचा आरोप केला आहे.उमर नझीर काश्मिरी यांच्या म्हणण्यानुसार, रावळकोटमधील डी-चौक येथे आंदोलन अद्याप सुरू असून मागील तीन ते चार दिवसांत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर थेट गोळीबार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला असून, त्यामुळे अनेक आंदोलकांचा मृत्यू झाला आणि अनेक सहकारी जखमी झाले, असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, ३१ जुलै रोजी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे या घटनांच्या निषेधार्थ मोठे आंदोलन पार पडले. या आंदोलनात माजी सिनेटर मुश्ताक खान यांच्यासह मोठ्या संख्येने पाकिस्तानी आणि काश्मिरी नागरिक सहभागी झाले होते. जी-१० मरकझ येथे आयोजित सभेत सहभागी झालेल्यांनी एकजूट दर्शवत आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला. उमर नझीर काश्मिरी यांनी या आंदोलनाचे आयोजन केल्याबद्दल माजी सिनेटर मुश्ताक खान आणि इतर आयोजकांचे आभार मानले. तसेच इस्लामाबादमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या पाकिस्तान आणि काश्मीरमधील नागरिकांचेही त्यांनी कौतुक केले. हे आंदोलन ऐतिहासिक ठरल्याचे सांगत, भविष्यातही लोकांनी आपल्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि आपला आवाज अधिक प्रभावीपणे मांडावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.