दिल्ली अग्रलेख,
vande-mataram : ‘वंदे मातरम’चा अपमान करणाऱ्यात अपराधी ठरवून संबंधितांस दंडित करण्याची तरतूद असलेल्या राष्ट्रीय गौरव अपमान प्रतिबंधक कायद्यातील दुरुस्ती विधेयकाला संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे ‘वंदे मातरम’ला ‘जन गण मन’ या राष्ट्रगीताच्या बरोबरीचा दर्जा प्राप्त होणार आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर तो लागू होईल आणि यापुढे ‘वंदे मातरम’चा अपमान करणाऱ्याला थेट तुरुंगात जावे लागेल. हे ऐतिहासिक असे विधेयक पारित करून घेतल्याबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन केले पाहिजे.

‘जन गण मन’ हे आपले राष्ट्रगीत (नॅशनल अँथेम) तर ‘वंदे मातरम’ हे मातृभूमीची आराधना करणारे राष्ट्रीय गीत (नॅशनल साँग) आहे. देशातील लोकांचे पोषण करणाऱ्या, त्यांना शक्ती प्रदान करणाऱ्या भारतमातेला मातेच्या स्थानी कल्पिणारे हे गीत. आजही ‘वंदे मातरम’ गाताना आणि ऐकताना समस्त देशभक्तांच्या अंगावर रोमांच उभे राहतात. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या लेखणीतून साकारलेले हे गीत एके काळी स्वातंत्र्य आंदोलनाचा मूलमंत्र झाले होते. एका साध्या कवितेपासून सुरू झालेला ‘वंदे मातरम’चा प्रवास, उशिरा कां होईना, कायदेशीर पद्धतीने राष्ट्रीय गीतापर्यंत पोहोचला, ही भारतभूमीवर प्रेम करणाऱ्या कोट्यवधी लोकांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.
‘वंदे मातरम’ची जन्मकथा अतिशय रोचक आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय सरकारी अधिकारी होते. पश्चिम बंगालमधील एका रेल्वे प्रवासात गाडीतून बाहेरचे सृष्टिसोंदर्य न्याहाळत असताना चट्टोपाध्याय हरखून गेले आणि त्यांच्या अलौकिक प्रतिभेतून ‘वंदे मातरम’चा जन्म झाला. सुरुवातीला ही फक्त एक कविता होती. पुढच्या काळात हे गीत स्वातंत्र्य आंदोलनाचे प्रेरणागीत होईल, याची कल्पनाही त्यावेळी कुणी केली नसेल. चट्टोपाध्याय यांनी ‘आनंदमठ’ ही ऐतिहासिक कादंबरी लिहिली आणि तीत ‘वंदे मातरम’चा समावेश केला गेला. त्यानंतर ‘वंदे मातरम’चे महत्त्व वाढले. ‘वंदे मातरम’चा नारा देत हजारो स्वातंत्र्य संग्राम सैनिक हसत-हसत फासावर चढले. १८९६ मध्ये कलकत्ता येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या १२ व्या अधिवेशनात पहिल्यांदा हे गीत गायिले गेले. त्यानंतर ते देशभर प्रसिद्ध झाले. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी या गीताला संगीत दिले आणि गायिलेही. टागोरांच्या ओजस्वी आवाजात हे गीत पहिल्यांदा लोकांनी ऐकले, तेव्हा ते हरखून गेले आणि ते गीत ‘हे आई (मातृभूमी), मी तुला वंदन करतो’ या भावनेच्या पल्याड जाऊन स्वातंत्र्य आणि राष्ट्रवादाचा प्रखर स्वर बनले.
बंगालच्या फाळणीनंतर ‘वंदे मातरम’ने राष्ट्रवादाची भावना देशवासीयांमध्ये तीव्रतेने जागृत केली. लोक एकमेकांना अभिवादन करण्यासाठी ‘वंदे मातरम’चा वापर करू लागले. त्यात हिंदू-मुस्लिम असे सारेच होते. १९०५ मध्ये ‘वंदे मातरम’ हा स्वदेशी आंदोलनाचा मुख्य नारा झाला. वंगभंग आंदोलन आणि असहकार आंदोलनात ‘वंदे मातरम’ने प्रभावी भूमिका पार पाडली. या गीताचा जनमानसावरील प्रभाव एवढा वाढला की, इंग्रजांना त्यावर बंदी घालावी लागली. मॅडम भिकाजी कामा यांनी १९०७ मध्ये जर्मनीच्या श्टुटगार्ट येथे पहिल्यांदा तिरंगा फडकाला, तेव्हा त्याच्या मध्यभागी देवनागरीत ‘वंदे मातरम’ असे लिहिले होते. त्यानंतर या गीताने स्वातंत्र्य लढ्यात जागविलेल्या चैतन्याचा परिणाम इतिहासात नोंदविला गेला आहे.
२०२५ मध्ये ‘वंदे मातरम’ला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मोदी सरकारने देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. आता तर सर्व शासकीय कार्यक्रमात ‘वंदे मातरम’ आणि ‘जन गण मन’ अशी दोन्ही गीते वाजवली जातात. १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ‘जन गण मन’ आणि ‘वंदे मातरम्’ यांपैकी कोणत्या गीताला सर्वोच्च राष्ट्रीय मान द्यायचा, यावर चर्चा झाली. दोन्ही गीतांनी भारतीयांच्या राष्ट्रभावनेला प्रेरणा दिली असल्याने एका गीताची निवड करणे सोपे नव्हते. अखेरीस २४ जानेवारी १९५० रोजी संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत (नॅशनल अँथेम) म्हणून घोषित केले, तर स्वातंत्र्यलढ्यातील ऐतिहासिक योगदानाची दखल घेत ‘वंदे मातरम्’ला समान सन्मान व राष्ट्रीय दर्जा बहाल करण्यात आला. ‘जन गण मन’ला जो सन्मान आहे, तोच आणि तेवढाच सन्मान ‘वंदे मातरम’लाही मिळाला पाहिजे, असे डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी जाहीर केले होते. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी १९११ मध्ये ‘जन गण मन’ लिहिले होते. त्यापूर्वीच सर्वमुखी झालेल्या ‘वंदे मातरम’चा भारतीय जनमानसातील प्रभाव कायम राहिला. तो वाढतही गेला. २००२ मध्ये बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसने जागतिक पातळीवरील लोकप्रिय गीतांबाबत एक सर्वेक्षण केले असता ‘वंदे मातरम’ हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे लोकप्रिय गीत असल्याचे दिसून आले.
‘वंदे मातरम’ हे गीत स्वातंत्र्य आंदोलनात क्रांतिकारकांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण करून देणारे आहे. ते देशाबद्दलचे प्रेम, कर्तव्य आणि आदराची भावना जागृत करते. देशात एकता आणि अखंडतेची भावना निर्माण करते तसेच नागरिकांना देशभक्तीचे धडे देताना कर्तव्याची आठवणही करून देते. काँग्रेसच्या राजवटीत ‘वंदे मातरम’ची सर्वाधिक उपेक्षा करण्यात आली. त्या गीताला जाणीवपूर्वक सन्मानापासून वंचित ठेवले गेले. कारण एका विशिष्ट समुदायाला देशाला आई किंवा देव म्हणणे मंजूर नव्हते. खरे तर कोलकात्यात झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात ‘वंदे मातरम’ पहिल्यांदा जाहीरपणे गायिले गेले होते. पण त्याचे भान स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेसच्या नेतृत्वाला ठेवता आले नाही. अर्थातच त्याची राजकीय कारणे होती. मोदी सरकारने या पृष्ठभूमीवर ‘वंदे मातरम’साठी कायदेशीर तरतूद केली, हे समजून घेतले पाहिजे. कोणत्याही नागरिकाला ‘वंदे मातरम’ वा ‘जन गण मन’ गाण्यास बाध्य केले जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात म्हटले होते हे खरे. मात्र, एखाद्या राष्ट्रीय सन्मानाच्या प्रतीकाचा आदर न करू पाहणाऱ्याला त्याचा अपमान करण्याचा परवाना मिळत नाही, याचेही भान ठेवले पाहिजे.
‘वंदे मातरम’ दुरुस्ती विधेयकावरील चर्चेवरून काँग्रेसने नेहमीच राजकारण करण्याचा प्रयत्न केला.
‘वंदे मातरम’बद्दल सर्व लोकांच्या मनात आदराची भावना असल्यामुळे असे विधेयक आणण्याची गरजच नव्हती, असा दावा करत काँग्रेसने मुस्लिम तुष्टीकरणाच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला होता. अप्रत्यक्षपणे काँग्रेसने या विधेयकाला विरोधच केला. अशा तत्त्वांना जागेवर आणण्यासाठी सरकारला यासंदर्भात दंडात्मक कारवाईचे विधेयक आणावे लागले, ही वस्तुस्थिती आहे. मुस्लिम समाजातील बहुसंख्य लोक अजूनही ‘वंदे मातरम’ला सन्मान देत नाहीत, ते गात नाहीत. याचे कारण आहे त्यांचा धार्मिक विश्वास. इस्लामचा फक्त अल्लाहवर एकेश्वरवादी स्वरूपाचा विश्वास आहे. त्यामुळे इबादत म्हणजे पूजा, प्रार्थना, साष्टांग प्रणाम हा फक्त अल्लाहसाठी अशी त्यांची धारणा आहे. अल्लाहशिवाय इतर कुणाची पूजा वा नमस्कार करणे इस्लाममध्ये पाप मानले जाते. ‘वंदे मातरम’मध्ये तर मातृभूमीला दुर्गा आणि लक्ष्मीच्या रूपात दाखवले आहे.
भारतात दैवतांना विविध रुपांत पाहण्याची व त्यांची आराधना करण्याची परंपराच आहे. आजवर एका विशिष्ट समाजाकडून आणि त्यांच्या मतांवर डोळा असलेल्या राजकीय शक्तींकडून ‘वंदे मातरम’चा जाणीवपूर्वक अपमान करण्यात येत होता त्यामुळेच सरकारला ‘वंदे मातरम’चा अपमान हा दंडनीय अपराध असल्याचा कायदा करावा लागला. ज्या देशात तुम्ही राहता, त्या देशाला मातृभूमी मानणे ही साऱ्या दुनियेतील रीत असेल तर विशिष्ट समुदायाने या देशाच्या मातीला आई समजून वंदन करण्यास नकार देणे हे देशाच्या अखंडतेला बाधक आहे. त्यामुळेच उपरोक्त दुरुस्ती विधेयकाचे सर्वांनी स्वागत केले पाहिजे. अशी गीते राष्ट्रीय अस्मितेचा विषय असतात आणि अस्मितेचा पाया ठिसूळ असलेल्या राष्ट्रांची प्रगती नागरिकांच्या मानसिक ऐक्याविना कुंठित होत असते, हे लक्षात ठेवून पुनश्च ‘वंदे मातरम’चा नारा सतत बुलंद केला पाहिजे.