भुयारी मार्गाऐवजी उड्डाणपूलच अपरिहार्य

-अकोली अंडरपासवर भाजना नेत्यांचा उपाय -खा. डाॅ. अनिल बोंडे यांना दिले निवेदन

    दिनांक :01-Aug-2026
Total Views |
अमरावती, 
anil-bonde : अमरावती महापालिका क्षेत्रातील साईनगर प्रभागातील अकोली रेल्वे भुयारी मार्गामध्ये प्रत्येक पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर तात्पुरते उपाय न करता कायमस्वरूपी तोडगा म्हणून रेल्वे उड्डाणपूलच उभारण्यात यावा, अशी मागणी अमरावती महानपालिकेचे सभागृह नेता चेतन गावंडे यांच्यासह भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी केली आहे.
 
 
 
LK
 
 
या संदर्भात राज्यसभा सदस्य खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या माध्यमातून केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन अकोली अंडरपासच्या ठिकाणी उड्डाणपूल मंजूर करण्यासाठी शिष्टमंडळामार्फत निवेदन सादर करण्यात येणार आहे. चेतन गावंडे म्हणाले की, अकोली अंडरपासमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत होते. विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाण्यास, नागरिकांना दैनंदिन कामकाजासाठी तसेच रुग्णवाहिका व इतर आपत्कालीन सेवांना मोठा अडथळा निर्माण होतो. त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून उड्डाणपूलच उभारणे अत्यावश्यक आहे.
 
या प्रश्नाची गंभीरता लक्षात घेऊन आपण सातत्याने प्रशासनाचे लक्ष वेधले असून, आता केंद्र शासनाच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. उड्डाणपूल उभारल्यास अकोली परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित, सुरळीत आणि अखंडित होईल तसेच पावसाळ्यात नागरिकांना होणाऱ्या त्रासातून कायमस्वरूपी दिलासा मिळेल.
 
 
यावेळी आमदार मा. प्रवीण पोटे, भाजप नेते तुषार भारतीय, नगरसेवक ॲड. प्रशांत देशपांडे, बंडू हिवसे, चेतन पवार आदींची उपस्थिती होती. या सर्वांच्या समावेश असलेल्या शिष्टमंडळाने राज्यसभा सदस्य खासदार डॉ. अनिल बोंडे यांची भेट घेऊन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे अकोली अंडरपासच्या ठिकाणी उड्डाणपूल मंजूर करण्यासाठी प्रभावी पाठपुरावा करण्याची विनंती केली व तसे निवदेन दिले. या मागणीमुळे साईनगर व परिसरातील हजारो नागरिकांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी दूर होऊन भविष्यातील वाहतुकीसाठी सुरक्षित व कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास सभागृह नेता चेतन गावंडे यांनी व्यक्त केला.