भर भाषणात अमित ठाकरे थांबले आणि...

    दिनांक :01-Aug-2026
Total Views |
मुंबई,
Amit Thackeray paused during speech महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) २० व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी संघटनेच्या सदस्य नोंदणी अभियानालाही प्रारंभ करण्यात आला. अलीकडील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांच्या भाषणाकडे कार्यकर्त्यांचे विशेष लक्ष लागले होते. मात्र, अमित ठाकरे यांच्या भाषणादरम्यान अनपेक्षित प्रसंग घडल्याने उपस्थितांमध्ये चर्चेला उधाण आले.भाषण सुरू असताना अमित ठाकरे अचानक काही क्षण थांबले आणि, "मला काय बोलायचं सुचत नाही... मी परत येतो," असे म्हणत व्यासपीठावरून खाली उतरले. काही वेळानंतर ते पुन्हा मंचावर आले आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपले भाषण पूर्ण केले.
 
 

THAKRE 
 
भाषणात अमित ठाकरे यांनी अलीकडील विद्यार्थी आंदोलनाचा उल्लेख करत आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांचे कौतुक केले. "ज्या तरुणांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आणि केंद्रातील राजीनामा घ्यायला भाग पाडले, त्यांच्यासाठी टाळ्या व्हायला हव्यात," असे ते म्हणाले. तसेच, "मी राजसाहेबांचा मुलगा नसतो, तर राजकारणात आलो नसतो. पण मी राजकारणात टिकून आहे, ते माझ्या सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे," असेही त्यांनी स्पष्ट केले.पुढे बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना जुन्या आंदोलनांपेक्षा नव्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. "आतापर्यंतची कामे विसरा, पुढे काय करायचे याचा विचार करा. गेल्या आठवड्यात आपण पुराच्या परिस्थितीत व्हॅनमधून लोकांना आणि विद्यार्थ्यांना बाहेर काढत होतो. तो आत्मविश्वास तुमच्या पाठिंब्यामुळे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वामुळे मिळाला," असे त्यांनी सांगितले.
 
 
राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना अमित ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. तसेच दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनातील एका विद्यार्थ्याचा उल्लेख करत तो नागपूरचा असल्याचा दावा केला आणि या प्रकरणावर मुख्यमंत्री काहीच बोलले नसल्याची टीकाही त्यांनी केली. "मतदारांनी विकासासाठी मतदान केले आहे. पाच वर्षांत काम झाले नाही, तर सत्ताधाऱ्यांना बदलण्याचा अधिकार जनतेकडे आहे," असे ते म्हणाले.यावेळी त्यांनी मनविसेच्या सदस्य नोंदणी अभियानाची घोषणा करत राज्यभरातील विद्यार्थ्यांना संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन केले. "राजसाहेबांना जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे, तर मला महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी विद्यार्थी संघटना उभी करायची आहे. त्यासाठी तुमच्या सहकार्याची गरज आहे," असे आवाहन अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले.