बुडालेल्याचा मृतदेह २४ तासाने सापडला

एसडीआरएफच्या पथकाने काढली धाम नदी पिंजून

    दिनांक :01-Aug-2026
Total Views |
पवनार, 
dham-river : धाम नदीतील गांधीस्तंभ परिसरातील गायमुख कुंडात प्रशांत प्रभाकर माणूसमारे (३५) हा शुक्रवारी सायंकाळी बुडाला होता. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) विशेष बचाव पथकाने आज १ रोजी सकाळपासून सायंकाळपर्यंत विशेष बोट, तसेच आधुनिक बचाव साहित्याच्या सहाय्याने नदीपात्राचा कानाकोपरा पिंजून काढला. दिवसभराच्या अथक प्रयत्नांनंतर सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मृतदेह हाती लागला. पथकाने तो मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदानासाठी रवाना करण्यात आला.
 

l; 
 
शुक्रवारी सायंकाळी गांधीस्तंभ परिसरातील रस्त्यावरून जात असताना प्रशांत माणूसमारे यांचा तोल जाऊन धाम नदीतील खोल गायमुख कुंडात पडला. पाण्याची खोली आणि वेगवान प्रवाहामुळे तो काही क्षणांतच बेपत्ता झाला. घटनेनंतर सेवाग्राम पोलिसांनी स्थानिक नागरिक व जलतरणपटूंच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत शोधकार्य केले होते. मात्र अंधार आणि खोल पाण्यामुळे मोहिमेला यश आले नव्हते.
 
आज शनिवारी सकाळी एसडीआरएफचे विशेष बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. प्रशिक्षित जवानांनी मोटारबोटीच्या सहाय्याने नदीपात्रात वारंवार फेर्या मारल्या. गायमुख कुंडासह परिसरातील खोल भाग, भोवरे आणि प्रवाहाच्या दिशेने अनेक किलोमीटरपर्यंत तपासणी करण्यात आली. प्रत्येक संशयित ठिकाणी शोधकार्य करण्यात आले. अखेर, सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास पथकाला यश आले.
 
शोधमोहीमेदरम्यान सेवाग्राम पोलिस स्टेशनचे ठाणेदार देवेंद्र ठाकूर, स्थानिक नागरिक तसेच स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नदीकाठी दिवसभर प्रशांत यांच्या नातेवाईकांनी ठाण मांडून बसत प्रत्येक क्षणाकडे आशेने पाहिले. सायंकाळ होताच शोधकार्य थांबविण्याच्या हालचाली सुरू होण्यापूर्वीच मृतदेह हाती लागला. अन्यथा रविवारी सकाळपासुन शोध मोहीम सुरू करण्याची तयारी करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.