जम्मू,
Break in Amarnath Yatra सततच्या मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रेवर पुन्हा एकदा परिणाम झाला असून, शनिवारी जम्मूहून निघणारा यात्रेकरूंचा ताफा स्थगित करण्यात आला. २५० किलोमीटर लांबीचा जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग (एनएच-४४) सलग दुसऱ्या दिवशीही वाहतुकीसाठी बंद असल्याने भगवती नगर बेस कॅम्पमधून काश्मीरकडे जाणाऱ्या नवीन यात्रेकरूंना पुढे जाता आले नाही.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उधमपूर जिल्ह्यातील लाढा-समरोली परिसरात महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याचे मोठे नुकसान झाले होते. शुक्रवारी अमरनाथ यात्रेचा ताफा मार्गस्थ झाल्यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव महामार्ग दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आला. त्यानंतर झालेल्या पावसामुळे रस्त्यावर चिखल साचल्याने दुरुस्तीचे काम आणखी कठीण झाले आहे.
रामबन आणि उधमपूर जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याने महामार्ग सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एनएच-४४ हा काश्मीर खोऱ्याला देशाच्या इतर भागांशी जोडणारा प्रमुख बारमाही मार्ग असल्याने तो बंद पडल्याचा थेट परिणाम अमरनाथ यात्रेवर झाला आहे.यात्रेकरूंची संख्या घटल्याच्या पार्श्वभूमीवर श्री अमरनाथजी तीर्थक्षेत्र मंडळाने (SASB) नोंदणी आणि टोकन वितरणाची व्यवस्था तावी रिव्हरफ्रंटवरून भगवती नगर बेस कॅम्प येथे हलवली आहे. ऑफलाइन नोंदणी, टोकन वितरण, ई-केवायसी पडताळणी आणि आरएफआयडी (RFID) कार्ड वितरणाची सुविधा आता तेथून उपलब्ध करून देण्यात येत आहे.
३ जुलैपासून सुरू झालेल्या यंदाच्या अमरनाथ यात्रेत आतापर्यंत सुमारे ४.५ लाख भाविकांनी दक्षिण काश्मीर हिमालयातील पवित्र गुहा मंदिरात दर्शन घेतले आहे. नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या बर्फाच्या शिवलिंगाच्या दर्शनासाठी दरवर्षी देशभरातून लाखो भाविक येथे येतात.यापूर्वीही मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे काही दिवसांसाठी यात्रा स्थगित करण्यात आली होती. सुमारे सहा दिवसांनंतर ती पुन्हा सुरू करण्यात आली होती. यंदाची अमरनाथ यात्रा २८ ऑगस्ट रोजी, रक्षाबंधनाच्या दिवशी, समाप्त होणार असून पुढील प्रवासाची स्थिती हवामान आणि महामार्ग पूर्ववत होण्यावर अवलंबून असेल.