सुनेत्रा पवारांवरची टीका; महिला विराेधाभास!

    दिनांक :01-Aug-2026
Total Views |
मुंबई वार्तापत्र,
नागेश दाचेवार,
sunetra-pawar : महिलांच्या सक्षमीकरणाच्या घाेषणा देणारे आणि संसदेत महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा असल्याचे सांगणारे विराेधी पक्ष महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांवर सातत्याने वैयक्तिक टीका करत असतील, तर त्याला राजकीय दुटप्पीपणा म्हणायचा की महिलांविराेधातील पूर्वग्रह? असा प्रश्न आता जनतेसमाेर उभा ठाकला आहे. एका बाजूला महिला आरक्षणासाठी नक्राश्रू ढाळायचे आणि दुसऱ्या बाजूला राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना लक्ष्य करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे षडयंत्र रचायचे, ही विराेधकांची भूमिका, विराेधाभास उघडपणे समाेर आला आहे. सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री, पक्ष प्रमुख हाेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांनी, महिला नेतृत्वाला प्राेत्साहन देण्याऐवजी, खच्ची करण्याचे राजकारण करणे हा देखील विराेधाभासच म्हणावा लागेल.
 
 
 
PAWAR
 
 
‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ (महिला आरक्षण विधेयक) याचे उद्दिष्ट लाेकसभा, राज्यांच्या विधानसभा आणि दिल्ली विधानसभेतील थेट निवडून येणाऱ्या जागांपैकी ३३ टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवणे, हे आहे. हे विधेयक देशाचे राजकीय चित्र बदलण्याची आणि राजकारणात महिलांचे वाढीव प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्याची संधी देते. हे विधेयक मंजूर हाेण्यासाठी संसदेत आवश्यक त्या दाेन तृतीयांश पाठिंब्याची गरज असली, तरी त्यामागील मूळ उद्देश साध्य करण्यासाठी खऱ्या राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. जर महिलांच्या नेतृत्व क्षमतेवरच वारंवार आणि अवाजवी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतील तर महिला सक्षमीकरणाची भावनाच अर्धवट राहील.
 
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांची नियुक्ती हा राज्याच्या निवडणूक-राजकीय प्रवासातील एक महत्त्वपूर्ण आणि अपरिहार्य घटना ठरली आहे. त्यांची या पदावरची नियुक्ती म्हणजे महिलांना प्रतिनिधित्व देण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल म्हणावे लागेल. एक महिला राजकारणातल्या आव्हानांचा सामना करू शकते, पुढाकार घेऊन नेतृत्व करू शकतात, हे त्यांनी दाखवून दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेली नेतृत्वाची पाेकळी भरून काढत, सुनेत्रा पवार राज्याच्या राजकारणात एक निर्णायक शक्ती म्हणून पुढे आल्या. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यापूर्वी, त्यांनी राज्यसभेत नामनिर्देशित खासदार म्हणून काम पाहिले हाेते. आपल्या संसदीय जबाबदाऱ्यांबाबत त्यांनी दृढ निष्ठा दर्शविली आहे. राज्यसभेच्या कार्यकाळात त्यांनी १२६ प्रश्न उपस्थित केले, जी ९२, या राष्ट्रीय सरासरीपेक्षा कितीतरी अधिक आहे. महात्मा जोतिराव आणि सावित्रीबाई फुले यांच्यापासून प्रेरणा घेऊन, महाराष्ट्राने महिलांमध्ये शिक्षण आणि सामाजिक न्यायात समानतेचा पुरस्कार केला आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती, हा त्याच वारशाचा पुढचा टप्पा आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे म्हणजे महाराष्ट्राच्या समाजसुधारकांनी निर्माण केलेल्या आदर्शांना छेद आहे.
 
 
विराेधी पक्षांची दुटप्पी भूमिका
 
 
प्रियांका वढेरा, सुप्रिया सुळे आदी विराेधी आघाडीतल्या प्रमुख महिला नेत्यांनी वारंवार महिलांच्या अधिक प्रतिनिधित्वाची मागणी केली आहे. सुप्रिया सुळेंनी तर महिला आरक्षण विधेयक लागू करण्यास हाेत असलेल्या विलंबावर सातत्याने आवाज उठवला आहे. प्रियंका वढेरांनीही महिला सक्षमीकरणाच्या खंबीर पुरस्कर्त्या म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण केली आहे. उत्तर प्रदेशच्या मागच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी ‘लडकी हूँ, लड सकती हूँ..’ ही घाेषणा दिली हाेती. पण, सुनेत्राताईंच्या बाबतीत मात्र, त्यांना त्यांच्यात ‘महिला’ दिसत नाही. त्यांना पाठिंबा देण्याऐवजी त्यांच्याबाबतीत गैरसमज पसरवणे, त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करणे, सातत्याने वैयक्तिक टीका करणे यांसारख्या गाेष्टी या मंडळींकडून सुरू असतात.
 
लाेकशाहीत निकाेप चर्चेचे नेहमीच स्वागत केले जाते. मात्र, अलिकडच्या घडामाेडींवरून असे दिसून येते की, राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध नकारात्मक बातम्या पेरण्याचे एक पद्धतशीर षडयंत्र सुरू आहे. ज्याचा उद्देश सुनेत्रा पवार पक्ष सांभाळण्यास असमर्थ आहेत, अशी त्यांची प्रतिमा निर्माण हाेईल. सुनेत्रा पवार यांनी जानेवारी २०२६ मध्ये पदभार स्वीकारला. त्यांना पुरेसा वेळ दिल्यानंतर, त्यांच्या कारभाराच्या आणि धाेरणात्मक निर्णयांच्या आधारेच त्यांच्या नेतृत्वाचे मूल्यमापन करणे याेग्य आहे. पण तसे न करता त्यांच्याविराेधात संभ्रम निर्माण केला जात आहे. सुनेत्रा पवार यांना लक्ष्य केवळ त्या महायुतीसाेबत आहेत म्हणून केले जात आहे. जर का त्या महाविकास आघाडीसाेबत असत्या तर त्यांना हेच लाेकं डाेक्यावर घेऊन नाचले असते.
 
 
इंडिया आघाडी सध्या सर्वात कठीण टप्प्यातून जात आहे. महिला आरक्षणाला विराेध करणे राजकीयदृष्ट्या टिकण्यासारखे नाही, याची जाणीव आता प्रादेशिक पक्षांनाही हाेऊ लागली आहे. आघाडीतील डीएमके आणि राष्ट्रवादी (शप) यासारखे प्रमुख घटकपक्ष भाजपाच्या जवळ येत आहेत. या वास्तवामुळे राजकीय समीकरणे बदलू लागली असताना, आपली बदलती भूमिका स्पष्ट करण्याऐवजी या मंडळींनी विशिष्ट नेत्यांभाेवती वाद निर्माण करण्याचा मार्ग निवडला आहे. सुनेत्रा पवार यांच्यावरील शाब्दिक हल्ले म्हणजे या अस्वस्थ करणाऱ्या वास्तवापासून राजकीय सुटका करून घेण्याचा एक प्रयत्न आहे. खाेटे नरेटिव्ह सेट करणे, निवडक नेत्यांना लक्ष्य करणे आणि सातत्याने वैयक्तिक टीका करणे या सर्व गाेष्टी इंडिया आघाडीची कमकुवत हाेत चाललेली अंतर्गत एकता झाकण्याचा प्रयत्न आहे. नजीकच्या काळात हा प्रयत्नही विफल झालेला दिसेल.
९२७०३३३८८६