लाखांदुर,
Farmer dies after falling into mud. शेतात कामासाठी जात असताना चिखलात अचानक पाय घसरून डाव्या कालव्यातील खड्ड्यात तोंडघशी पडल्याने, पाण्यात दम घुटून एका तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना लाखांदुर तालुक्यातील कुडेगाव येथील गोसे खुर्द च्या डाव्या कालव्यावर १ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. प्रमोद ईश्वर ठाकरे (वय ३०, रा. कुडेगाव) असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत प्रमोद ठाकरे यांची कुडेगाव शिवारात सुमारे ०.२० हेक्टर शेती आहे. चालू खरीप हंगामात त्यांनी आपल्या शेतात धान (भात) पिकाची लावणी केली होती. घटनेच्या दिवशी सकाळी ९ वाजेच्या सुमारास प्रमोद हे शेतातील कामासाठी बाया कालव्याच्या रस्त्याने आपल्या शेताकडे जात होते. दरम्यान, कालव्याच्या रस्त्यावरील चिखलात त्यांचा अचानक पाय घसरला आणि ते कालव्यातील चिखलमय पाण्याने भरलेल्या खड्ड्यात तोंडघशी पडले.

तोंडावर चिखल आणि पाणी गेल्याने खड्ड्यातच त्यांचा दम घुटला आणि जागीच मृत्यू झाला. काही वेळेनंतर शेतात कामासाठी जाणाऱ्या महिला मजुरांच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती प्रमोद यांच्या कुटुंबीयांना, ग्रामस्थांना आणि लाखांदुर पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच लाखांदुर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निशांत जुनोनकर आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (पोस्टमार्टमासाठी) रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी लाखांदुर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. कुटुंबातीलुल एकुलत्या एक कमावत्या तरुण शेतकऱ्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने कुडेगावसह संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.