वेध,
सोनाली पवन ठेंगडी,
festivals-from-ashadhi-purnima : आषाढी पौर्णिमेपासून आपल्या सणावारांची जी मालिका सुरू होते ती थेट चंपाषष्ठीपर्यंत कायम असते. बहुतांश सण हे कुळाचारिक असतात. काही जणांकडे अगदी होळीसुद्धा कुळाचारिक सण असतो. पण, चातुर्मासातील सणांचा दणदणाट आणि झगमगाट काही औरच असतो. आखाडीच्या पुरणपोळीपासून कुळाचार सुरू झाला की फुलोरा, मेहुण जेऊ घालणे, अमूक एक पदार्थच करणे असे सगळे सोपस्कार पार पडत असतात. गेल्या काही वर्षांत या सर्व ‘सक्ती’च्या कार्यक्रमांना जोड मिळाली आहे ती तणावाची. कुळाचारिक सण म्हटला की घरातील कर्त्या मंडळींना प्रचंड ताण येतो. विशेषत: घरातील गृहिणीला सण म्हणजे शिवधनुष्य उचलण्यासारखं वाटत असतं.
अर्थात, याला कारणंही तशीच आहेत. एकतर घरातील गृहिणी आता घराबाहेर जाऊन काम करते. तिच्यासाठी रोजचा दिनक्रम म्हणजे तारेवरची कसरतच! त्यात पुन्हा सणवार म्हटले की जास्तीचे काम, पूर्वतयारी, चार लोकांना जेवायला बोलवायचे हे सर्व आलेच. सर्वात मोठी बाब असते ती खर्चाची. पूर्वी सण म्हटले की मोठे कुटुंब असल्याने अनेक जण मदतीला असायचे. सर्वजण मिळून काम करायचे. आता नात्यांमध्ये ‘इगो’ हा विषय जरा जास्तच सोकावला आहे. मी कशाला मदतीला जाऊ, मी इतकेच काम का करू, दुसऱ्यांच्या स्वयंपाकघरात काम सुचतच नाही अगदी इथपर्यंत मुद्दे असतात. शिवाय, घरात एक-दोनच अपत्य, तेही आपआपल्या गुंत्यात... या आणि अशा असंख्य प्रश्नांचा झंझावात असतो. परिणामी कुळाचारिक सणांमध्ये आपण शॉर्टकट मारायला सुरुवात केली; काळानुरूप बदल हवेच म्हणत इतरांनाही ते स्वीकारायला भाग पाडले. इथवर विषय स्वीकारता येण्यासारखा आहे. पण, याही पलीकडे जाऊन नवीन पिढीपर्यंत कुळाचार पोहोचविणे हा विषय जरा कठीणच होतोय. मुले दुसऱ्या शहरात, दुसऱ्या देशात वास्तव्यास असतात.
ते आपोआपच या जबाबदारीतून सुटतात. यामुळं होतं काय की, आपल्या सणावारांपासून आपलीच नवीन पिढीची नाळ तुटतेय हे जेवढं खेदजनक आहे, तेवढंच चिंताजनकही ठरू पाहतंय. मुळात, आता जे घरात कर्ते लोक आहेत त्यांनी नवीन पिढीला कुळाचारिक सण ओझं न वाटता त्याचा आनंद कसा घेता येईल, हे पटवून देणं गरजेचं आहे. मात्र, घडतंय काही वेगळंच. कर्ते लोकच कुळाचारिक सणांना वैतागल्यासारखे दिसतात. मग ते तडजोड स्वीकारतात. ही तडजोड काळानुरूप आणि आर्थिक विषयाशी निगडित असेल तर योग्यच; पण सरसकट सण करायचाच नाही, असे घडायला नको. छोट्या प्रमाणावर करा, त्यातील कुळाचारातील काही गोष्टींना तज्ज्ञांच्या मदतीने कमी-जास्त करा.
आता मूळ मुद्दा असा की, कुळाचाराचे बंधन वाटत असेल तर काय करायचे? यावर तज्ज्ञ मंडळी सांगतात की, कुळाचार हा सक्तीचा विषय आजच्या काळात राहूच शकत नाही. मात्र, कुळाचारात सांगितलेले नियम शक्य तितके पाळले तर त्यापासून कोणतीही हानी नक्कीच नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर सोवळे हा प्रकार आता कालबाह्य वाटू लागला आहे. हरकत नाही. मूळ उद्देश लक्षात घ्या. उद्देश स्वच्छता, शूचिता हा होता. म्हणून स्वच्छ धुतलेले कपडे घालूनही केलेला नैवेद्य देवाला स्वीकारार्ह राहीलच. हा बदल आता बहुतांश घरात स्वीकारलेला आहे. कोणी म्हणेल की, नाहीच केले सण तर काय बिघडणार आहे? अजिबात काही बिघडत नाही. पण, फक्त कल्पना करा की, आपल्या जगण्यातून जर हे सणवार काढून टाकले तर उरेल तरी काय? या सणांमधील आनंद शोधण्याचा आपण प्रयत्न का करत नाही? पाश्चिमात्यांचे वेगवेगळे ‘डे’ अर्थात दिवस आपण साजरे करतो. पण, आपले सणवार नको, हे कसे?
विशेष म्हणजे, आपल्या प्रत्येक सणामागे काही ना काही सामाजिक, कौटुंबिक आणि अगदी पर्यावरणविषयक असे उदात्त हेतू आहेत. ते सांगायचे तर तो स्वतंत्र लेखाचा विषय ठरेल. पण, एक गोष्ट नक्की की, आपले सणवार केवळ आनंदाचा किंवा देवाधर्माचा विषय नाही तर ते आपले सामाजिक आणि सांस्कृतिक दायित्व आहे. हा वसा आपल्या हाती आपल्या संस्कृतीने दिलेला आहे, जो आपल्याला नव्या पिढीपर्यंत चांगल्या स्थितीत पोहोचवायचा आहे. सणवार आणि त्यातील कुळाचार हे केवळ आनंदाचे दिवस नसून संस्कृती, परंपरा, कुटुंब, समाज आणि निसर्ग यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहेत. ते साजरे करताना त्यांच्या मागील मूल्यांचा स्वीकार करून आनंदाची उधळण व्हायला हवी. हा आनंद, समाधान आणि सलोखा हीच खरी भारतीय संस्कृतीची ओळख आहे. हा आनंद नव्या पिढीलाही मिळायलाच हवा.
९४०३२११६७३