नवी दिल्ली,
fir-against-meta-india-chief : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एडिट केलेल्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी हैदराबाद सायबर क्राईम पोलिसांनी सोशल मीडिया वापरकर्त्यांसोबत मेटा इंडियाच्या प्रमुखांनाही सह-आरोपी बनवले आहे. तर नोएडा पोलिसांनी मोदींविरोधात अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या एका महिलेवर झिरो एफआयआर दाखल केला आहे.

हैदराबाद पोलिसांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत करण्यात आली आहे. पोलिसांनी संबंधित सोशल मीडिया खात्यांच्या हँडलर्सना आरोपी बनवले आहे, तर मेटाचे इंडिया प्रमुख अरुण श्रीनिवास यांनाही दोन्ही प्रकरणांमध्ये सह-आरोपी म्हणून नामनिर्देशित केले आहे. पोलिसांच्या तपासानुसार, पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणारे हे आक्षेपार्ह आणि मॉर्फ केलेले व्हिडिओ दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पसरवले जात हाेते. हे आंदोलन कॉकरोच पार्टीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी आयोजित केले होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या हैदराबाद सायबर क्राईमच्या एका तपास अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही नोंदवलेल्या प्रकरणांबाबत आणि तक्रारदारांनी कळवलेल्या आक्षेपार्ह लिंक्सबाबत मेटाला नोटीस बजावली आहे.