माजी पोलिस महानिरीक्षकाला सुनावली फाशीची शिक्षा

    दिनांक :01-Aug-2026
Total Views |
कोलंबो,
police sentenced to death श्रीलंकेतील उच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या न्यायासनाने माजी पोलिस महानिरीक्षक पुजित जयसुंदरा यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. पूर्वसूचना मिळूनही २०१९ च्या ईस्टर संडे दहशतवादी हल्ल्यांना रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले.
 

police sentenced to death
 
न्यायमूर्ती प्रियंथा लियानागे आणि न्यायमूर्ती थिलकरत्ने बंदारा यांनी बहुमताचा निकाल दिला. तर न्यायमूर्ती विराज वीरासुरिया यांनी असहमतीचा निकाल दिला. बहुमताचा निकाल जाहीर करताना, पीठासीन न्यायमूर्ती लियानागे म्हणाले, जयसुंदरा त्यावेळी देशाचे पोलिस प्रमुख म्हणून कार्यरत होते़ नागरिकांचे संरक्षण करणे व सार्वजनिक सुरक्षा राखणे ही त्यांची जबाबदारी होती.
 
न्यायालयाने नमूद केले की, तत्कालीन राज्य गुप्तचर सेवेचे संचालक निलंथा जयवर्धना यांनी २० एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी जयसुंदरा यांना कळवले होते की, दुसऱ्या दिवशी कॅथोलिक चर्च आणि पर्यटन हॉटेल्सवर आत्मघाती हल्ले होण्याची शक्यता आहे. तथापि, जयसुंदरा हे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात अयशस्वी ठरले, असेही न्यायालयाने नमूद केले. गुन्हेगारी रोखणे आणि जनतेचे संरक्षण करणे हे कर्तव्य असलेले देशाचे अधिकारी म्हणून जयसुंदरा यांनी आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष केले होते. गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.
 
 
असहमतीच्या निकालात काय म्हटले?
आपल्या असहमतीच्या निकालात, वीरासुरिया यांनी नमूद केले की, फिर्यादी पक्ष जयसुंदरा यांच्यावरील आरोप वाजवी शंकेच्या पलीकडे सिद्ध करण्यात अयशस्वी ठरला आणि त्यांना निर्दोष मुक्त केले. निकाल देण्यासाठी न्यायालयाला चार तासांपेक्षा जास्त वेळ लागला. त्याच दिवशी नंतर न्यायालयाने माजी संरक्षण सचिव हेमासिरी फर्नांडो यांना २०१९ च्या दहशतवादी हल्ल्यांपूर्वी गुप्तचर यंत्रणेच्या इशाऱ्यांवर कारवाई करण्यात अयशस्वी ठरल्याबद्दल दोषी ठरवले आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावली.