अमरावती,
gajanan-ramkrishna-bharsakale : दर्यापूर तालुक्यातील माहुली (धांडे) येथील नोंदणीकृत व अनुदानित गाडगेबाबा गोरक्षण संस्थेचे संस्थापक तथा या समृद्ध गोभवनाचे शिल्पकार प्रा. गजानन रामकृष्ण भारसाकळे यांच्या ‘गाईच्या शेणापासून गोवरी उत्पादनास्तव आयओटी बेस मशीन निर्मिती‘ या अभिनव संशोधनाला भारत सरकारच्या डिझाईन्स अधिनियम, २००० अंतर्गत नोंदणीकृत औद्योगिक रचना श्रेणी मंजूर झाली आहे. ही मान्यता त्यांच्या नावीन्यपूर्ण संशोधनाची, तांत्रिक उत्कृष्टतेची आणि ग्रामीण विकासासाठी उपयुक्त तंत्रज्ञानाची राष्ट्रीय स्तरावर झालेली अधिकृत दखल आहे.

यापूर्वीही प्रा. भारसाकळे यांना भारत सरकारकडून एकाच वेळी ३ कॉपीराईट्स प्राप्त झाले असून पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, जैवऊर्जा आणि टाकावू वस्तूंपासून मूल्यनिर्मिती संकल्पनेवरील त्यांच्या गायीच्या शेणापासून रांगोळी व खडू निर्मिती संशोधनाची राष्ट्रीय स्तरावर नोंद झाली आहे. तीन कॉपीराईट्स अधिक डिझाईन पेटेंट अशी दुहेरी मान्यता मिळविणे ही अत्यंत दुर्मिळ, गौरवास्पद आणि प्रेरणादायी कामगिरी असल्याने प्रा . गजानन भारसाकळे यांनी अथक परिश्रमावर साकारलेल्या या यशाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. राज्याचा पशुसंवर्धन विभाग तथा महाराष्ट्र गोसेवा आयोग यांनी नोंद घ्यावी असे हे शेतकरी जीवन उत्कर्षाचे गोसेवा पूरक संशोधन असल्याने या कार्यास विशेष महत्व प्राप्त होणार आहे.
उन्नत भारत अभियान अंतर्गत सुद्धा ही सेवा येत असल्याने या अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मभूषण तथा संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांचे या आयओटी बेस मशीन निर्मिती कार्यास मार्गदर्शनाचा लाभ प्राप्त होणार असल्याची माहिती प्रा. भारसाकळे यांनी दिली आहे. या मशीन निर्मिती कार्यासाठी विद्यापीठाने हॅकेथॉन स्पर्धेतील पुरस्कारातून प्रा. भारसाकळे यांना डंक्स ॲन्ड हर्बस् या कंपनीद्वारे स्टार्टअप फंडासाठी केंद्र शासनाला मागणी करण्यात येणार आहे. प्रा. भारसाकळे हे शिवाजी शिक्षण संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत असल्याने संस्थेच्या बाभूळगांव, अकोला येथील अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाच्या लौकीकात मानाची भर पडली आहे. प्रा. भारसाकळे यांना यापूर्वीच अमरावती विद्यापीठाचे गाडगेबाबा समाजकार्य व पर्यावरण हे दोन्ही प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त आहेत.