गोंदिया,
gondia-ganja : स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थांविरोधात प्रभावी कारवाई करत २.५ किलो गांजासह एका युवकाला अटक केली. आरोपीकडून गांजा, अँड्रॉइड मोबाईल आणि अन्य साहित्य असा २ लाख १० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी ३१ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. मनीष दीपक रामटेके (२७) रा. गांधी वॉर्ड, गोंदिया असे आरोपीचे नाव आहे.

पोलिस अधीक्षक गोरख भामरे व अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या नेतृत्वात पथक ३१ जुलै रोजी रात्री रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी गड्डाटोली परिसरातील ओव्हरब्रिजखाली एक युवक गांजा विक्रीसाठी थांबून असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचून आरोपी मनीष रामटेके याला ताब्यात घेतले. पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडील दोन टिनच्या पेट्यांमध्ये २.०५ किलो हिरवा ओलसर गांजा आढळून आला. याशिवाय अमली पदार्थांच्या व्यवहारासाठी वापरण्यात आलेला एक अँड्रॉइड मोबाईलही जप्त करण्यात आला. या कारवाईत २ लाख ५०० रुपयांचा गांजा, १० हजार रुपयांचा मोबाईल, ३०० रुपयांच्या दोन टिनच्या पेट्या असा एकूण २ लाख १० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
...