हिंगणघाट
guru purnima स्थानिक आर. एस. बिडकर महाविद्यालयात भारत स्वाभिमान, पतंजली योग समिती, युवा भारत, महिला पतंजली योग समिती आणि पतंजली किसान सेवा समितीच्या संयुक्त वतीने पतंजली योगपीठ हरिद्वारच्या मार्गदर्शनाखाली पहाटे ५.३० वाजता गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरूवात वैदिक मंत्रोच्चाराने झाली. योगगुरू वसंत पाल यांनी सकाळचा योग वर्ग घेतला. यामध्ये विविध आसने, प्राणायाम आणि योग प्राणायामाची माहिती दिली. पतंजली योगपीठाच्या परंपरेनुसार भारतीय संस्कृतीचे रक्षण आणि उत्तम आरोग्यासाठी विशेष यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शांताराम हिवरकर महाराज यांच्या हस्ते होम-हवन कार्यक्रम संपन्न झाला. तसेच योगगुरु स्वामी रामदेव बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून गुरुपरंपरेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.यावेळी योग साधकांनी योग, यज्ञ, स्वदेशी आणि सनातन संस्कार जपण्याचा संकल्प केला.
पुलगावात आर्ट ऑफ लिव्हिंगची गुरू पौर्णिमा संपन्न
पुलगाव,
साई धाम येथील साई मंदिरात गुरू पौर्णिमा उत्सवानिमित्त साई पूजन करण्यात आले. यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंदिरात आकर्षक आणि सुगंधित फुलाची सजावट करण्यात आली होते.
पुलगाव येथील प्रसिद्ध वंडळकर ले आऊट मधील साई मंदिरात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सवाचेही आयोजन करण्यात आले होते. सकाळी ६ वाजतापासून साधना, दुपारी १ वाजता सेवाकार्य तर सायंकाळी ६.३० पासून गुरुपूजन करण्यात आले. रात्री ७.३० वाजता सत्संग झाला. यावेळी मोठ्या संख्येने आर्ट ऑफ लिव्हिंगचे सदस्य आणि भाविक उपस्थित होते.
विठ्ठल-रुख्माई मंदिर : येथे पहाटे ५ वाजता श्री विठ्ठल-रुख्माईला अभिषेक करण्यात आला. सकाळी १० वाजता कलाविष्कार संगीत विद्यालय, पुलगाव यांच्या वतीने नवोदित बालकलाकारांचा भक्तीगीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाला ठाणेदार ढाकणे,
अॅड. दिनेश शर्मा, डॉ. प्रकाश हनमंते, अशोक चांडक, दिलीप अग्रवाल, केशवराव दांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते बालकलाकारांचा साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. संचालन रिद्धी भांडे यांनी केले तर आभार सुभाष पेशकार यांनी मानले. यशस्वीतेसाठी सुरेश पारीसे, गजू सुरसे, मनोज उरकुडे, आशिष येखंडे, सुधाकर सुरसे यांनी सहकार्य केले.