भूस्खलन-पूराने केरळ हादरले; तिघांचा बळी

    दिनांक :01-Aug-2026
Total Views |
इडुक्की,
Kerala shaken by landslides and floods. केरळमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडत असून परिस्थिती गंभीर बनली आहे. इडुक्की जिल्ह्यात शनिवारी पहाटे झालेल्या भूस्खलनात एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला आहे. सततच्या पावसामुळे अनेक रस्ते बंद झाले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.इडुक्की जिल्ह्यातील अडरमाला परिसरात भूस्खलनाचा मोठा मलबा एका घरावर कोसळल्याने सुमती यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्यांचे पती रवी आणि मुलगा जखमी झाले असून त्यांच्यावर थोडुपुझा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), अग्निशमन दल, पोलीस आणि महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने घटनास्थळी बचावकार्य राबवून मृतदेह बाहेर काढला. वागामोन परिसरात भूस्खलनात अडकलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठीही मदतकार्य सुरू करण्यात आले होते.
 
 

केरल में भूस्खलन 
 
भूस्खलन आणि पूरामुळे इडुक्की जिल्ह्यातील अनेक प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. कट्टप्पना–वाझवारा मार्ग बंद ठेवण्यात आला असून पुलकायर नदीला आलेल्या पुरामुळे कोक्कायर परिसरातील पूल पाण्याखाली गेला. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. वंडीपेरियार परिसरातील चट्टुप्पारा नाल्याला पूर आल्याने राष्ट्रीय महामार्ग १८३ काही काळ पाण्याखाली गेला, तर नेल्लीमाला मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने काही लहान धरणांचे दरवाजे उघडले आहेत.कोट्टायम जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. एराट्टुपेटा, कांजीरपल्ली, कुट्टिकल आणि एरमेली परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून अनेक निवासी भाग जलमय झाले आहेत. पूंजार येथील पय्यानिथोट्टम परिसरात झालेल्या भूस्खलनात जोसेफ या तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याची आई ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे. वागामोन भागात झालेल्या दुसऱ्या भूस्खलनात प्रभाकरन नायर यांचाही मृत्यू झाला आहे.
 
 
एराट्टुपेटा शहरात रात्रीतून पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्याने प्रशासनाने काही मार्गांवरील वाहतूक बंद केली. नाडक्कल आणि मुरिक्कोली परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून बचाव पथकांनी स्थानिकांच्या मदतीने अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. पथानामथिट्टा जिल्ह्यातील डोंगराळ भागातही भूस्खलनाच्या घटना नोंदविण्यात आल्या असून राणी आणि आसपासच्या भागात पूरस्थिती गंभीर असल्याची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिली आहे. भारतीय हवामान विभागाने पथानामथिट्टा, कोट्टायम, इडुक्की, मलप्पुरम, कोझिकोड, वायनाड, कन्नूर आणि कासारगोड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. एर्नाकुलम, त्रिशूर आणि पालक्काड जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून अनेक जिल्ह्यांतील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.