वनवासींच्या भवितव्याशी आयुष्यभराचे नाते

    दिनांक :01-Aug-2026
Total Views |
प्रासंगिक,
विवेक गिरिधारी,
lifetime-achievement-award : प्रमोदराव व रंजनाताई करंदीकर हे ध्येयवादी हे दाम्पत्य गेली चार दशके वनवासी जनजाती समाजाच्या सर्वांगीण उत्थानासाठी झटत आहे. त्यांच्या या निरलस कामाची दखल घेत पुण्यातील सरस्वती मंदिर संस्थेतर्फे त्यांना १ ऑगस्ट २०२६ रोजी ‘सेवाव्रती जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येत आहे. यानिमित्त...

JKL 
 
 
प्रमोदराव व रंजनाताई करंदीकर या ध्येयवादी दाम्पत्याने गेली चार दशके वनवासी समाजाच्या उत्थानाशी, भवितव्याशी आपले नाते सांगत एक आगळे-वेगळे जीवन जगण्याचा जाणीवपूर्वक प्रामाणिक प्रयत्न केला आहे. सुरुवातीला वनवासी कल्याण आश्रम व नंतर शबरी सेवा समिती या माध्यमातून त्यांनी गेली ४४ वर्षे समर्पण भावनेतून वनवासी जनजाती समाजासाठी काम केले आहे. या निरलस व निःस्वार्थ जीवनप्रवासाची दखल घेत पुण्यातील सरस्वती मंदिर संस्थेतर्फे त्यांना ‘सेवाव्रती जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. संस्थेला १०० वर्षे पूर्ण झाल्यानंतर २०२३ मध्ये या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. आयुष्यभर समर्पित भावनेने सेवाकार्यासाठी झोकून देऊन काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येत आहे. शाल, श्रीफळ व काम करणाऱ्या संस्थेसाठी रु. ५१ हजार देणगी स्वरूपात दिले जातात.
 
 
प्रमोद करंदीकर हे मूळचे धुळ्याचे. त्यांचा जन्म १७ फेब्रुवारी १९५७ मध्ये झाला. शिक्षण एम. कॉम.पर्यंत असून सर्व शिक्षण धुळ्यातच झाले. त्यांचे काका १९४६ मध्ये प्रचारक म्हणून निघाले होते. आणिबाणीच्या काळात त्यांच्या वडिलांना व मोठ्या भावाला अटक होऊन ते १९ महिने कारागृहात होते. तरुण वयात संघाच्या मुशीतच त्यांच्या ध्येय व धारणा पक्क्या झाल्या होत्या. आणिबाणीच्या काळात महाविद्यालये बंद असल्याने श्रीगुरुजींचे विचारधन आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे एकात्म मानवदर्शन वाचून काढले. या काळात संघशाखा बंद झाल्या तेव्हा तो तालमीत हिरीरीने सहभागी होऊ लागला. आजोबांचे कुस्तीप्रेम त्याच्यात उतरले होते. एम. कॉम. दुसऱ्या वर्षाला असताना धडगाव येथील वनवासी विद्यार्थी वसतिगृहावर दोन आठवडे राहण्याचा योग आला. त्यादरम्यान वनवासी समाजाची विपन्नावस्था व विदारक स्थिती याचे दर्शन झाले. वनवासी समाजासाठी पुढील आयुष्यात काम करायचं हा विचार तिथेच प्रथम मनाशी पक्का झाला.
 
वनवासी कल्याण आश्रमाचे ज्येष्ठ कार्यकर्ते कै. बाळासाहेब दीक्षित यांच्याशी परिचय झाल्यावर त्यांच्या सूचनेनुसार प्रमोदने कल्याण आश्रमाच्या कामात प्रत्यक्ष सहभागी होण्यास १९७८ मध्ये सुरुवात केली. सुरुवातीला पूर्वोत्तर भारतात वर्षभराच्या कामानंतर त्यांच्यावर कर्जतजवळील वैजनाथ येथे वनवासी मुलांचे वसतिगृह चालू करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. १९८१ च्या दरम्यान जबलपूरच्या सुशीलाबाई ताम्हणकर या वैजनाथ येथे वास्तव्यास आल्या. तेथे मुलींचेही वसतिगृह चालू झाले. त्यांच्या मदतीला कर्जत येथून बी.ए. च्या शेवटच्या वर्षाला शिकणारी रंजना गांगल ही युवती कार्यकर्ती येऊ लागली. एके दिवशी सुशीलाताईंनी प्रमोदजवळ सहजपणे पण सहेतूक लग्नाचा विषय काढला व रंजनाचे नावही सुचविले. प्रमोद मग ठरवून रंजनाशी लग्न या विषयावर मोकळेपणाने व स्पष्टपणे बोलला. आयुष्यभर नोकरी वगैरे न करता साधेपणाने राहून पूर्णवेळ सामाजिक काम करणार असल्याचा मनोदय व निग्रह त्याने रंजनाजवळ व्यक्त केला. दोघे १३ ऑगस्ट १९८२ रोजी विवाहबद्ध झाले आणि पाचव्या दिवशी वैजनाथ केंद्रावर हजरही झाले.
 
 
 
जून १९८६ मध्ये वैजनाथ केंद्र बंद करून कोठींबे येथेच मुलींचेही वसतिगृह हलविण्यात आले. वसतिगृह स्थिरावल्यावर कृषी विकासाचे व फलोद्यानाचे प्रयोग चालू झाले. पावसाळ्यात भाजीपाला लागवड केली जाऊ लागली. एक कुक्कुटपालन केंद्रही सुरू करण्यात आले. खांदन गावात भाजीपाला लागवड गट तयार करण्यात आला. कल्याण आश्रमातर्फे अखिल भारतीय स्तरावर क्रीडा स्पर्धा भरवायचे ठरविले गेले. कल्याण आश्रमाच्या वाढत्या कामासाठी आता प्रांतभर फिरण्याची गरज होती. जून १९८९ पासून प्रमोदराव वैजनाथ-कोठिंबे हा १० वर्षांचा अध्याय संपवून डोंबिवलीत राहण्यास आले. प्रांत प्रकल्प प्रमुख म्हणून नवीन जबाबदारी त्यांच्यावर आली. वर्ष २००० मध्ये प्रमोदरावांकडे ग्राम विकासाची अखिल भारतीय जबाबदारी सोपविण्यात आली.
 
रंजनाताई यांच्याकडेही महाराष्ट्र प्रांताची महिला प्रमुख, पश्चिम उत्तर क्षेत्राची म्हणजे आठ प्रांतांची क्षेत्रीय महिला प्रमुख म्हणून जबाबदारी आली. विविध प्रांतात वनवासी क्षेत्रात प्रवास करताना ठळकपणे लक्षात आलेली बाब म्हणजे बालकांचे कुपोषण व बालमृत्यूचे वाढते प्रमाण. त्यातून शबरी सेवा समिती या स्वतंत्र रचनेचे बीज रोवले गेले. ९ सप्टेंबर २००३ रोजी शबरी सेवा समितीची रीतसर नोंदणी करण्यात आली. कर्जत तालुक्यातील तेलंगवाडी येथे महिला व मुलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करून शबरीच्या कामाचा श्रीगणेशा झाला. त्या अंतर्गत विविध उपक्रमांसह गर्भवती महिलांची तपासणी केली जात असे. यासाठी शबरीचे अध्यक्ष डॉ. नीलकंठ फडके आवर्जून उपस्थित असत. पुढे नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि अक्कलकुवा या परिसरात हे काम विस्तारण्यास मदत केली. शहादे येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. अलका कुलकर्णी यांनी १० वर्षे आपल्या रुग्णालयात शबरी सेवा समितीच्या माध्यमातून आलेल्या कुपोषित बालकांवर मोफत उपचार केले. सोबतच आदिवासींचे सामूहिक विवाह समारंभ घेण्यात आले. शबरी समितीने इयत्ता पहिली ते चौथी या वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका चालू केल्या असून ७५ हून अधिक ठिकाणी या अभ्यासिका चालतात. याला जोड देत १२ ठिकाणी शिवणकाम प्रशिक्षण वर्गातून ८०० हून अधिक महिलांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत झाली आहे. जव्हार तालुक्यात १८ हजारांहून अधिक आंबा कलमांची तर धुळे परिसरातील अक्कलकुआ येथे ५० हजार साग रोपांची लागवड करण्यात आलेली आहे. आदिवासी पाड्यांवरील ६१ सामुदायिक विहिरी शबरीने शेतीसाठी लोकसहभागातून खोदल्या आहेत. अशाच प्रकारे लोकसहभागातून ४० पाड्यांवर पाणी उपसा सिंचन योजना राबविण्यात आल्या असून त्यातून सुमारे १४०० एकर शेतजमिनीला सिंचनाची हमी मिळाली आहे.
 
आज दोघेही जण सत्तरीच्या उंबरठ्याच्या अलिकडे उभे आहेत; पण सतत वाढत्या कामाची स्वप्ने बघत आहेत. सामाजिक जाण आणि भान असणारा मुलगा आदित्य व सून मानसी असल्यामुळे हे साधते आहे. स्वतःच्या संसाराची सुरुवात वनवासी भागात राहायला जाऊन करणारे हे दाम्पत्य आजही ४४ वर्षांनंतर तन-मनाने वनवासींच्या सोबतच आहे. त्यांच्याच आशा-आकांक्षाशी एकरूप झालेले आहे.
९४२२२३१९६७