अनिल कांबळे,
नागपूर,
nagpur-crime : विवाह संकेतस्थळावरून संपर्कात आलेल्या महिलेचा विनयभंग केल्याचा तसेच दुसऱ्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप असलेल्या प्रियकराविरुद्ध शहरातील दोन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी ३० जुलै रोजी गुन्हे नोंदवले. आरोपीचे नाव प्रीतम रवी लावणकर (३६) असून तो सह्याद्री स्कूलजवळील पिंपळा फाटा परिसरात राहतो.
विवाह संकेतस्थळावरून ओळख, गैरवर्तनाचा आरोप
बजाजनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३४ वर्षीय महिलेची प्रीतम लावणकर याच्याशी ‘जीवनसाथी’ या विवाह संकेतस्थळावरून ओळख झाली होती. दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेतल्यानंतर नियमित संपर्क सुरू होता. त्यानंतर त्यांची प्रत्यक्ष भेटही झाली. तक्रारदार महिलेच्या आरोपानुसार, एका भेटीदरम्यान लावणकर याने तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. याचवेळी त्याने नको त्या ठिकाणी स्पर्श करुन तिच्याशी अयोग्य वर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप महिलेने केला आहे. तिने त्याला विरोध केल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि तेथून दोघेही निघून गेले. यानंतर लावणकरचे दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याचे समजल्याचा दावा तिने केला. याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने आपल्याला शिवीगाळ केल्याचेही महिलेने तक्रारीत म्हटले आहे. लग्नाचे आश्वासन देऊन आपली दिशाभूल केल्याचा आणि गैरवर्तन केल्याचा आरोप करत तिने पोलिसांत धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
फेसबुकवरून ओळख अन् शारीरिक संबंध
दुसऱ्या प्रकरणात बेलतरोडी पोलिसांनी ३१ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून लावणकरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार महिलेची आरोपीशी जानेवारी २०२६ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. ऑनलाइन संवादातून त्यांच्यात मैत्री निर्माण झाली आणि पुढे त्याचे रूपांतर संबंधात झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. लावणकर तिला विविध ठिकाणी घेऊन गेला. मनीषनगर परिसरातील एका हॉटेलमध्येही त्याने तिला नेले. लग्न करण्याचे आश्वासन देत त्याने तिच्याशी अनेक वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप महिलेने केला आहे. काही काळानंतर तिने लग्नासाठी आग्रह धरला असता आरोपीने लग्नास नकार दिला आणि शिवीगाळ केल्याचेही तिने पोलिसांना सांगितले. तिच्या तक्रारीनंतर बेलतरोडी पोलिसांनी BNS कलम ६९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे कलम फसव्या किंवा कपटपूर्ण मार्गाने, त्यात खोटे लग्नाचे आश्वासन देऊन, लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याशी संबंधित आहे. दोन्ही प्रकरणांचा तपास संबंधित पोलिस ठाण्यांकडून सुरू असून, आरोपांची सत्यता तपासण्यासाठी पोलिसांकडून पुढील चौकशी केली जात आहे.