वर्धा
mp amar kale पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांची पुण्यतिथी २१ मे रोजी असल्याने तो दिवस ‘राष्ट्रीय वृक्ष कृतज्ञता दिन’ म्हणून राष्ट्रीय स्तरावर घोषित करण्यात यावा, अशी मागणी खासदार अमर काळे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव यांचेकडे मागणी केली आहे.
निवेदनात नमुद केल्यानुसार, वृक्ष पर्यावरणाचा समतोल राखतात. शुद्ध हवा, ऑक्सिजन, जलसंधारण, जैवविविधतेचे संरक्षण आणि हवामान बदलाच्या संकटावर मात करण्यासाठी वृक्षांचे महत्त्व अमूल्य आहे. त्यामुळे वृक्षांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी २१ मे हा दिवस राष्ट्रीय स्तरावर ‘वृक्ष कृतज्ञता दिन’ म्हणून साजरा करावा. सुंदरलाल यांनी संपूर्ण आयुष्य वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणासाठी समर्पित केले. त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे हा दिवस वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण जनजागृतीला समर्पित करणे होय. या निमित्ताने देशभरातील शाळा, महाविद्यालये, शासकीय संस्था आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून वृक्षारोपण, संवर्धन आणि पर्यावरणविषयक जनजागृतीचे कार्यक्रम राबवून पर्यावरण संरक्षणाला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप देता येईल, असा विश्वास खासदार अमर काळे यांनी निवेदनात व्यक्त केला.
केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव यांनी खा. काळे यांच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे खा. काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयातून कळवण्यात आले.