जम्मू,
Mufti condemns the killing of laborers. जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम येथे स्थलांतरित मजुरांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी)च्या अध्यक्षा आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी तीव्र निषेध केला आहे. निष्पाप मजुरांना लक्ष्य करणे ही अत्यंत अमानवी आणि क्रूर घटना असल्याचे सांगत त्यांनी या हल्ल्याची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.माध्यमांशी बोलताना मेहबूबा मुफ्ती यांनी छत्तीसगडमधील दोन मजुरांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. या घटनेबद्दल बोलण्यासाठी आपल्याकडे शब्द नसल्याचे सांगत त्यांनी, आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी घरापासून दूर आलेल्या कामगारांवर हल्ला करणे कोणत्याही परिस्थितीत योग्य ठरू शकत नाही, असे म्हटले.
अमरनाथ यात्रेदरम्यान संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात असते. अशा परिस्थितीत कुलगामसारखा दहशतवादी हल्ला घडल्याने सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.मेहबूबा मुफ्ती यांनी अलीकडील काळात मोठ्या प्रमाणावर नागरिकांना 'ओव्हर ग्राउंड वर्कर्स' (OGWs) किंवा दहशतवादाशी संबंध असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतले जात असल्याचा उल्लेख केला. दहशतवादी घटनांचा तपास आवश्यक असला तरी त्याच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांचा छळ होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही दहशतवादी हल्ला कसा घडला, याचा निष्पक्ष तपास होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. खोऱ्यातील हिंसाचाराचे दुष्टचक्र थांबले पाहिजे, कारण त्याचा सर्वाधिक फटका शांततेत जीवन जगणाऱ्या आणि कष्टाने उदरनिर्वाह करणाऱ्या निष्पाप नागरिकांनाच बसत असल्याचे मेहबूबा मुफ्ती यांनी स्पष्ट केले.