चित्रसंवाद,
अनंत मुळे,
national-library-nagpur : नागपूरच्या ऐतिहासिक वास्तूंमधील एक असलेले महाल परिसरातील राष्ट्रीय वाचनालय आजही महत्त्वाचे सांस्कृतिक आणि वैचारिक केंद्र म्हणून अभिमानाने उभे आहे. दीडशेहून अधिक वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या या संस्थेने केवळ पुस्तकांचेच जतन केले नाही, तर राष्ट्रीय विचार, समाजजागृती आणि वाचनसंस्कृती रुजविण्याचे मोलाचे कार्य केले आहे.
या वाचनालयाची स्थापना इ. स. १८६३ मध्ये ब्रिटिशकाळात 'नेटिव्ह लायब्ररी' या नावाने झाली. सुरुवातीला ते नील सिटी हायस्कूल (सध्याचे डीडी नगर विद्यालय, महाल) येथे कार्यरत होते. इ. स. १९०६ मध्ये संस्थेचे नामकरण 'नॅशनल लायब्ररी' असे करण्यात आले आणि त्याच सुमारास वाचनालयाचे स्थलांतरण सध्याच्या वास्तूत झाले. स्वातंत्र्यानंतर या संस्थेला 'राष्ट्रीय वाचनालय' हे नाव प्राप्त झाले. पुढे इ. स. १९४९ मध्ये कायदेशीर रीत्या 'राष्ट्रीय वाचनालय' या नावाने संस्थेची नोंदणी करण्यात आली.
राष्ट्रीय वाचनालय ज्या वास्तूमध्ये कार्यरत आहे, ती भोसलेकालीन ऐतिहासिक बुरूज असलेली वास्तू आहे. पूर्वी अशा बुरुजांचा उपयोग राज्याच्या संरक्षणासाठी, शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि साम्राज्याच्या सुरक्षेसाठी केला जात असे. काळ बदलला, युद्धाचे स्वरूप बदलले. त्यामुळे या बुरुजाची आज एक वेगळी भूमिका आहे. आज ही वास्तू समाजाला परकीय विचारांच्या अंधानुकरणापासून सावध करीत राष्ट्रीय मूल्ये आणि वाचनसंस्कृतीचे संरक्षण करणारा वैचारिक बुरूज म्हणून कार्यरत आहे.
वाचनालयाच्या उभारणी व विकासात अनेक मान्यवरांचे मोलाचे योगदान राहिले. राजे बहादूर रघुजी भोसले, बापूराव दादा किनखेडे, सर गंगाधरराव चिटणवीस आणि के. भि. भल्लव यांनी तन, मन आणि धनाने संस्थेला बळ दिले. या योगदानाचा उल्लेख दि मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनचे सचिव पी. एन. जोशी यांनी इ. स. १९४१ मध्ये संकलित व प्रकाशित केलेल्या पुस्तकात आढळतो.
स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय वाचनालय हे केवळ पुस्तकांचे दालन नव्हते, तर राष्ट्रीय चळवळीचे आणि समाजपरिवर्तनाच्या विचारांचे प्रेरणास्थान होते. पारतंत्र्याविरुद्ध जनजागृती, स्वातंत्र्याची प्रेरणा आणि सामाजिक परिवर्तनाची जाणीव निर्माण करण्यासाठी या संस्थेने महत्त्वपूर्ण कार्य केले.
नागपूरच्या सांस्कृतिक इतिहासातही राष्ट्रीय वाचनालयाचे स्थान अत्यंत मानाचे आहे. इ. स. १९३३ मध्ये नागपूर येथे भरलेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचा बहुमान या संस्थेला मिळाला. त्या संमेलनाचे अध्यक्षपद प्रख्यात साहित्यिक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी भूषविले होते. हा प्रसंग नागपूरच्या साहित्यिक इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
काळाच्या ओघात काही काळ संस्थेवर प्रतिकूल परिस्थिती आली. परंतु कै. जयवंत गोविंद फडणीस यांच्या अथक परिश्रमांमुळे वाचनालयाला नवसंजीवनी मिळाली. आजही डॉ. मुधोजी महाराज भोसले यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य संस्थेला लाभत आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या पूर्वजांनीच ही ऐतिहासिक वास्तू वाचनालयासाठी दान दिली होती.
आज राष्ट्रीय वाचनालयात सुमारे २७ हजारांहून अधिक पुस्तके असून त्यामध्ये अनेक दुर्मिळ ग्रंथ, संदर्भग्रंथ आणि ऐतिहासिक साहित्य काळजीपूर्वक जतन करण्यात आले आहे. विद्यमान कार्यकारिणीच्या प्रयत्नांतून दरवर्षी शेकडो दर्जेदार आणि नव्या पुस्तकांची भर पडत असून वाचकांसाठी ज्ञानसंपदा सातत्याने समृद्ध होत आहे.
नागपुरातील अनेक नामवंत साहित्यिक, अभ्यासक, प्रशासकीय अधिकारी, समाजसेवक आणि विविध क्षेत्रांतील ख्यातनाम व्यक्तिमत्त्वांनी या वाचनालयातून बहुमूल्य ज्ञान प्राप्त केले. त्यामुळे राष्ट्रीय वाचनालय ही केवळ एक संस्था नसून नागपूरच्या वैचारिक परंपरेची जपणूक करणारे आणि भावी पिढ्यांना ज्ञानाचा दीप देणारे प्रेरणास्थान आहे.
वाचनसंस्कृती, सामाजिक उत्तरदायित्व आणि राष्ट्रीय बांधिलकी यांचा सुंदर संगम घडविणारे राष्ट्रीय वाचनालय हे खऱ्या अर्थाने नागपूरच्या सांस्कृतिक वैभवाचे आणि ऐतिहासिक अस्मितेचे प्रतीक आहे.