रौप्य जिंकल्यानंतर नीरजने दिले निवृत्तीचे संकेत?

    दिनांक :01-Aug-2026
Total Views |
ग्लासगो,
Neeraj after winning silver २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकत भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने दमदार पुनरागमन केले आहे. गेल्या वर्षभरापासून दुखापत आणि फिटनेसच्या समस्यांशी सामना करणाऱ्या नीरजने या कामगिरीसह राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात भालाफेक प्रकारात सुवर्ण आणि रौप्य अशी दोन्ही पदके जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळवला.रौप्यपदक जिंकल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना नीरज चोप्राने भारतीय भालाफेकीच्या भविष्यासंदर्भात आशावाद व्यक्त केला. त्याने कांस्यपदक विजेता यशवीर सिंगचे विशेष कौतुक करत, आपण मैदानात नसलो किंवा दुखापतीमुळे खेळू शकलो नाही तरी देशात पदके जिंकण्याची क्षमता असलेले अनेक भालाफेकपटू तयार होत असल्याचे सांगितले.
 

Neeraj after winning silver 
यशवीरने ८५ मीटर क्लबमध्ये प्रवेश केला असून रोहितचीही सातत्यपूर्ण कामगिरी समाधानकारक असल्याचे त्याने नमूद केले.नीरजने सांगितले की, या स्पर्धेतील त्याचा एकच थ्रो अपेक्षेप्रमाणे झाला, तर उर्वरित प्रयत्न अधिक चांगले होऊ शकले असते. ग्लासगोमधील थंड हवामानात सर्वोत्तम कामगिरी करणे आपल्यासाठी नेहमीच आव्हानात्मक ठरते आणि उबदार वातावरणात खेळणे अधिक सोयीचे वाटते, असेही त्याने स्पष्ट केले. आगामी २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेत अधिक चांगली कामगिरी करण्याचा विश्वासही त्याने व्यक्त केला. यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धांचे आयोजन जपानमध्ये होणार आहे.
 
 
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या नवव्या दिवशी भारताने एकूण २३ पदकांची कमाई केली. नीरजच्या रौप्यपदकासह यशवीर सिंगने भालाफेकीत कांस्यपदक जिंकत भारताची कामगिरी अधिक उजळवली.दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे नीरज चोप्रा आणि यशवीर सिंग यांचे अभिनंदन केले. नीरजने सातत्य, संयम आणि जिद्दीच्या जोरावर पुन्हा एकदा भारताची मान उंचावल्याचे मोदी यांनी म्हटले. तसेच यशवीर सिंगच्या कांस्यपदकाचे कौतुक करत, त्याची कामगिरी अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा देणारी असल्याचे त्यांनी नमूद केले.