नागपूर,
अनिल कांबळे
suicide प्रेमविवाह केल्यानंतर क्षुल्लक कारणावरुन पत्नीशी घरगुती वाद झाला. रागाच्या भरात दीड वर्षीय चिमुकलीला घेऊन पती आत्महत्या करण्यासाठी निघाला. पत्नी वेड्यासारखी रडत-रडत पती व मुलीचा शोध घेत रस्त्याने फिरत होती. दरम्यान, दोन बीट मार्शलने तिची चौकशी केली. लगेच ठाणेदाराला माहिती दिली. संपूर्ण पोलिस पथकाने रात्री दोन वाजेपर्यंत परिसर पालथा घातला. शेवटी त्यांचा शोध घेतला. पती-पत्नीचे पोलिस ठाण्यात समूपदेशन करीत घरी पोहचवले. त्या बाप-लेकीसाठी पोलिस देवदूत ठरले. ही घटना बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

मध्यप्रदेशातील कुरळी शहरात राहणारा ऋतिक आणि राणी या दोघांचे प्रेमसंबंध होते. दोघांनी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दोघांच्याही कुटुंबियांनी त्यांच्या प्रेमविवाहास विरोध दर्शविला. त्यामुळे दोघांनीही अडीच वर्षांपूर्वी गावातून पळून जाऊन प्रेमविवाह केला. लग्नानंतर कामाच्या शोधात दोघेही नागपुरात आले. त्यांना बेलतरोडी हद्दीतील सिद्धार्थनगरात सुरु असलेल्या निर्माणाधीन इमारतीवर मजूर म्हणून काम मिळाले. दोघेही तेथेच काम करायला लागले. त्यांना मुलगी झाली. सर्व काही सुरळीत सुरु असताना गुरुवारी रात्रीच्या सुमारास दारु पिऊन आलेल्या पतीने वाद घातला. कडाक्याचे भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात ऋतिकने दीड वर्षीय मुलीला घेऊन आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. तो मुलीला खांद्यावर घेऊन रात्री घराबाहेर निघून गेला. राणीने शेजाऱ्यांना मदतीचा हात मागेपर्यंत तो दिसेनासा झाला.
कासावीस आई रस्त्यावर सुटली धावत
पती व मुलीचा शोध घेण्यासाठी राणी पळतच आऊटर रिंग रोडने निघाली. किरर्र अंधारात ती शोध घेत होती. तेवढ्यात बेलतरोडीचे पोलिस कर्मचारी भूषण पेशने, अतुल जाधव हे दुचाकीने गस्त घातल होते. त्यांना ती महिला दिसली. तिची चौकशी केली असता सत्य समोर आले. त्यांनी ठाणेदार रितेश अहेर यांना माहिती दिली. ठाणेदाराने ठाण्यातील दोन पथकांना आऊटर रिंग रोड परिसरात शोधकार्यास पाठवले. रात्री अडीच वाजता रस्त्याने पळत सुटलेल्या ऋतिकला मुलीसह पोलिसांनी ताब्यात घेतले आणि सुटकेचा नि:श्वास सोडला.
गैरसमजातून घडला प्रकार
पत्नी बाजारातून तासभर उशिरा आल्यामुळे पती ऋतिकला गैरसमज झाला. त्यातून वाद होऊन पती-मुलींसह आत्महत्या करण्यासाठी निघाला.suicide मात्र, तिला माहेरची लोकं भेटली होती, त्यामुळे ती उशिरा आल्याचे समोर आले. ठाणेदार रितेश अहेर यांनी दोघांचे समूपदेशन केले. पतीचा गैरसमज दूर झाला. दोघांच्याही कुटुंबियांना माहिती देऊन त्यांच्या ताब्यात दिले. बाप-लेकीसाठी पोलिस देवदूत ठरल्याची प्रचिती आहे.