पेपरफुटीच्या आरोपांनी पंजाब ढवळून निघाला

    दिनांक :01-Aug-2026
Total Views |
चंदिगढ,
Protests in Punjab over paper leak पंजाबमधील फार्मसी ऑफिसर भरती परीक्षेतील कथित गैरप्रकारांच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजधानी चंदीगडमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी)च्या कार्यकर्त्यांनी पंजाब सरकारविरोधात आंदोलन छेडले असून, शिक्षणमंत्री हरजोत सिंग बैन्स यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. फार्मसी ऑफिसर भरती परीक्षेत पेपरफुटी झाल्याचा आरोप करत विद्यार्थी आणि विविध संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. याचबरोबर राज्यातील इतर भरती परीक्षांमध्येही प्रश्नपत्रिका फुटल्याचे आरोप उपस्थित करण्यात येत आहेत. मात्र, शिक्षणमंत्री हरजोत सिंग बैन्स यांनी हे आरोप फेटाळून लावत ही पेपरफुटी नसून अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने करण्यात आलेल्या फसवणुकीची घटना असल्याचे स्पष्ट केले आहे.
 
 
panjab
 
या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) चौकशी करण्याची मागणीही जोर धरत आहे. एबीव्हीपीसोबतच भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल यांनीही या मुद्द्यावरून भगवंत मान सरकारविरोधात आंदोलन सुरू केले आहे.विरोधी पक्षांचा आरोप आहे की, गेल्या साडेचार वर्षांत राज्यातील विविध भरती परीक्षांमध्ये अनेक वेळा प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, आम आदमी पक्षाने हे आरोप फेटाळून लावत त्यांच्या सरकारच्या कार्यकाळात एकाही परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचा दावा केला आहे. विरोधक जनतेची दिशाभूल करण्यासाठी खोटा प्रचार करत असल्याचाही आरोप पक्षाने केला आहे. दरम्यान, १९ जुलै रोजी पंजाब पोलिसांनी फार्मसी ऑफिसर भरती परीक्षेदरम्यान कार्यरत असलेल्या एका आंतरराज्यीय कॉपी रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या कारवाईत टोळीतील ११ सदस्यांसह १० उमेदवारांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणावरून राज्यातील राजकारण अधिकच तापले असून पेपरफुटीच्या आरोपांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.