नवी दिल्ली,
safe effective treatment for hiv संशाेधक मागील अनेक वर्षांपासून एचआयव्ही प्रतिबंधक उपाय शोधत आहेत. संशोधकांच्या या प्रयत्नांना आता यश मिळाले आहे. ‘एचआयव्ही’च्या नवीन उपचाराची माणसांवरील पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. यामुळे संशोधकांना या विषाणूशी लढण्याचा आणखी एका प्रभावी मार्ग मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शरीरात होणारी एचआयव्ही-१ विषाणूची वाढ थांबवण्यासाठी व्हीच-४९९ नावाने ओळखले जाणारे हे औषध तयार करण्यात आले आहे. हे विषाणूच्या ‘कॅप्सिड प्रोटीन’ला लक्ष्य करून उपचार करते. हे औधष विषाणूभोवती एक संरक्षक कवच तयार करते. शास्त्रज्ञांनी अलीकडेच एचआयव्ही-१ बाधित २३ प्रौढांवर एक ‘फेज २-अ क्लिनिकल’ चाचणी पूर्ण केली. यांनी अद्याप एचआयव्हीचे प्रमाणित उपचार सुरू केले नव्हते. २० सहभागींना व्हीएच-४९९ चे वेगवेगळे डोस देण्यात आले, तर तिघांना ‘प्लेसिबो’ देण्यात आला. उपचारापूर्वी, सर्व सहभागींच्या रक्तात एचआयव्हीचे प्रमाण जास्त होते.
व्हीएच-४९९ घेतल्यानंतर, अभ्यासाच्या अकराव्या दिवसापर्यंत औषध घेतलेल्या प्रत्येक रुग्णाच्या शरीरातील विषाणूंच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. ज्यांना नवीन औषधाची मात्रा जास्त प्रमाणात दिली, त्यांच्यामध्ये विषाणूचे प्रमाण कमी झाल्याचे दिसले. याउलट, ‘प्लेसबो’ दिलेल्या गटात फारच कमी बदल दिसून आला. व्हीएच-४९९ हे मानवी शरीराला सहन होण्यायोग्य असू्न ते सुरक्षितही आहे, असा अहवाल संशोधकांनी दिला. या औषधात तीव्र विषाणूविरोधी क्रियाशीलता आहे आणि ते एचआयव्ही उपचारांच्या पर्यायांमध्ये एक महत्त्वपूर्ण भर घालू शकते, असे या निष्कर्षांवरून सूचित होते.
हे संशोधन ‘क्लिनिकल इन्फेक्शियस डिसीजेस’ मध्ये प्रकाशित झाले. शास्त्रज्ञांना व्हीएच-४९९ मध्ये रस असण्याचे एक कारण म्हणजे, अनेक औषधांवर प्रक्रिया करण्यात भूमिका बजावणाऱ्या सीव्हायपी३ए४ या एन्झाइमसोबत त्याची आंतरक्रिया कमी होत असल्याचे दिसून येते. वेगवेगळ्या आरोग्य समस्यांसाठी अनेक औषधे घेणाऱ्यांसाठी औषधांमधील आंतरक्रिया एक आव्हान ठरू शकते.
व्यापक वापरासाठी अधिक चाचण्यांची आवश्यकता
हे परिणाम उत्साहवर्धक असले तरी, हे औषध रुग्णांपर्यंत पोहोचण्यापूर्वी अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. त्याची सुरक्षितता आणि परिणामकारकता निश्चित करण्यासाठी आणि सध्याच्या एचआयव्ही उपचारांशी थेट तुलना करण्यासाठी मोठ्या फेज-३ चाचण्यांची आवश्यकता असेल. जर भविष्यातील अभ्यास यशस्वी झाले, तर व्हीएच-४९९ दीर्घकाळ टिकणाऱ्या एचआयव्ही उपचारांची व्याप्ती वाढविण्यात मदत करू शकते आणि येत्या काही वर्षांत एचआयव्हीचा प्रसार कमी करण्याच्या जागतिक प्रयत्नांना पाठिंबा देऊ शकते.