वरूड,
sexual-assault-on-a-minor-girl : बैतुल जिल्ह्यातील आमला पोलिस स्टेशन हद्दीतील १७ वर्षीय अल्पवयीन युवती ताज खान मजने खान यांच्या मंडीत संत्रा तोडणीसाठी मजुरीला आली होती. तेव्हा तिची ओळख स्वप्निल हेमराज कुमरे (२५, रा. पांढरी जि. बैतुल) याच्यासोबत झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. ३ महिने मंडीत कामानिमित्त राहिल्याने त्या दोघांत बरेचदा शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. त्यातून ती गर्भवती राहिली. त्यानंतर स्वप्निल तिला त्याच्या मूळगावी घेऊन गेला.
परंतु, ती अल्पवयीन असल्याने त्याच्या आईवडिलांनी तिचा स्वीकार केला नाही. त्यामुळे त्यांना जेथे काम मिळत होते तेथे ते राहात होते. तिला ९ वा महिना सुरू झाल्याने गर्भधारणेची वेळ पूर्ण होत आली असून तिच्या कुटुंबीयांनी तिला अमरावती येथील रुग्णालयात दाखल केले. परंतु, ती अल्पवयीन असल्याने तेथील डॉक्टरांनी याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती दिली. तिने पोलिसांजवळ संपूर्ण हकीकत बयाण केली. ती स्वप्निलच्या बाळाची आई होणार असल्याची कबुली तिने २४ जुलै रोजी गाडगेनगर पोलिसांना दिली. सदर घटनास्थळ शे.घाट पोलिस ठाणे हद्दीतील असल्याने गाडगेनगर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास शे.घाट पोलिसांकडे वर्ग केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पोस्को कायद्यांतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार राहुल गवई यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.