नवी दिल्ली,
vande bharat भारतीय रेल्वेने एक ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली आहे. वंदे भारत कार्गो ट्रेनच्या वेगाची चाचणी यशस्वी झाली आहे. वंदे भारत कार्गो ट्रेन आता प्रवासी ट्रेनप्रमाणे १४५ किमी प्रति तास वेगाने धावण्यास सक्षम अन् सज्ज झाली आहे. यामुळे मालवाहतुकीत एक नवीन अध्याय प्रारंभ होऊ शकतो, असा कयास बांधला जात आहे.
वंदे भारत चेअर कार, वंदे भारत स्लीपर ट्रेन, वंदे भारत मेट्रो यानंतर आता वंदे भारत या संकल्पनेवर तयार करण्यात आलेली वंदे भारत कार्गो ही मालवाहतुकीसाठी विशेष करून तयार करण्यात आलेली ट्रेन लवकरच सेवेत येऊ शकते. देशातील विविध भागात या ट्रेनची चाचणी सुरू आहे. या चाचणीवेळी वंदे भारत कार्गो ट्रेनने ताशी १४५ किलोमीटरचा कमाल वेग गाठला. सध्या पश्चिम मध्य रेल्वेच्या कोटा विभागात या चाचण्या घेतल्या जात आहेत. देशभरातील मालवाहतुकीला गती देणे आणि भारतीय रेल्वेचे लॉजिस्टिक्स नेटवर्क अधिक आधुनिक व कार्यक्षम बनवणे, हे या नवीन मालगाडीचे उद्दिष्ट आहे.
भारतीय रेल्वेने वंदे भारत कार्गो ट्रेनसाठी एक महिन्याचा चाचणी कार्यक्रम तयार केला आहे. या कालावधीत, कोटा-नागदा-सवाई माधोपूर रेल्वे मार्गावर विविध वेग आणि परिचालन परिस्थितींमध्ये ट्रेनची चाचणी घेतली जाईल. कोटा विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सौरभ जैन यांच्या मते, ही देशातील पहिली १६ डब्यांची वंदे भारत प्लॅटफॉर्म-आधारित मालवाहू ईएमयू प्रोटोटाइप रेक आहे. भारतीय रेल्वेवरील पार्सल आणि लॉजिस्टिक्स सेवा अधिक जलद, अधिक वक्तशीर आणि आधुनिक करण्याच्या उद्देशाने ही ट्रेन चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आली आहे.
दररोज चालवल्या जाणार दोन फेऱ्या
भारतीय रेल्वेच्या पहिल्या वंदे भारत कार्गो ट्रेनच्या चाचणीत अनेक तांत्रिक आणि सुरक्षा चाचण्या घेण्यात येतील. दररोज किमान दोन फेऱ्या चालवल्या जातील. चाचणीसाठी कमाल वेग ताशी १४५ किमी निश्चित करण्यात आला आहे. कोटा विभागात मजबूत रेल्वे ट्रॅक नेटवर्क, आधुनिक सिग्नलिंग प्रणाली, कार्यक्षम परिचालन प्रणाली आणि सुरक्षित हाय-स्पीड चाचणी कॉरिडॉर यांमुळे हा विभाग नवीन ट्रेन आणि आधुनिक रेल्वे तंत्रज्ञानाच्या चाचणीसाठी आदर्श ठरतो.