अमरावती,
amaravati-news : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची घटक संस्था असलेल्या व साहित्य क्षेत्रात शतकोत्तर वाटचाल करीत असलेल्या विदर्भ साहित्य संघ, नागपूरची २०२६ ते २०३१ या कार्यकाळासाठी सर्वसाधारण सभेमध्ये नवीन कार्यकारिणी जाहीर झालेली आहे. त्यानुषंगाने विदर्भ साहित्य संघ, नागपूरशी संलग्न असलेल्या अमरावती जिल्हा शाखेची २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यात अमरावती जिल्हा शाखेचे अध्यक्ष म्हणून डॉ. श्यामसुंदर निकम यांची तर सचिवपदी आबासाहेब कडू यांची निवड करण्यात आली आहे.

कार्यकारणीत कार्याध्यक्ष म्हणून डॉ. सुभाष गवई, उपाध्यक्ष म्हणून डॉ. कुमार बोबडे, दीपक दारव्हेकर व राजेश बहाळे तर सहसचिव विशाल मोहोड. कोषाध्यक्ष डॉ. पंकज वानखडे, कार्यक्रम समिती प्रमुख म्हणून माधव पांडे यांची उपस्थित सर्व सदस्यांच्या संमतीने निवड करण्यात आली. विशेष निमंत्रित म्हणून सुदर्शन गांग यांचा तर पदसिद्ध सदस्य म्हणून केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. शोभा रोकडे यांचा समावेश कार्यकारिणीमध्ये करण्यात आला. प्रमुख कार्यकारिणी सदस्यांमध्ये डॉ. सुरेश चापोरकर, डॉ. राजेंद्र राऊत, नितीन भट, शिवचरण प्रधान, तल राऊत व डॉ. दिनेश राऊत यांचा समावेश आहे. प्रसिद्धी प्रमुख म्हणून संदीप देशमुख व विशाल कन्हेरकर, समन्वयक म्हणून खुशाल गुल्हाने, गजानन काकडे व किशोर जऱ्हाड यांचा समावेश आहे.
सल्लागार मंडळामध्ये प्रदीप देशपांडे, डॉ. अविनाश असनारे, अविनाश दुधे, कांचन उल्हे, डॉ. मनोज तायडे, विष्णू सोळंके, संजय महल्ले, दिलीपसिंह खांबरे, इंदिरा ठाकरे, पद्माकर मांडवधरे यांचा समावेश करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे, विदर्भ साहित्य संघाची स्थापना स्व. अन्नासाहेब खापर्डे यांनी १४ जानेवारी १९२३ रोजी सर्वप्रथम अमरावती शहरातच केलेली होती. त्यामुळे या शाखेला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. सदर शाखेच्या पदाधिकाऱ्यांचा स्वागत समारंभ लवकरच आयोजित करण्यात येणार आहे.