पुणे,
20 companies to leave Chakan देश-विदेशातील नामांकित वाहन कंपन्यांमुळे औद्योगिक नकाशावर वेगळी ओळख निर्माण केलेल्या चाकण एमआयडीसीसमोर आता मोठे संकट उभे राहिले आहे. परिसरातील खराब रस्ते, मोठमोठे खड्डे, सातत्याची वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटनांमुळे त्रस्त झालेल्या २० लघुउद्योगांनी चाकणमधून स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या कंपन्या सातारा जिल्ह्यातील खंडाळा एमआयडीसीमध्ये जाण्याच्या तयारीत असून, त्यासाठी संबंधित कंपन्यांनी संघटना स्थापन करून जागा मिळवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.या २० कंपन्यांचे स्थलांतर झाल्यास चाकणच्या औद्योगिक क्षेत्राला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. या कंपन्यांची एकत्रित उलाढाल सुमारे १ हजार कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. कंपन्या स्थलांतरित झाल्यास सुमारे ४ हजार कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये भविष्यातील रोजगार, कर्जाचे हप्ते आणि मुलांच्या शिक्षणाबाबत चिंता निर्माण झाली आहे.

चाकण एमआयडीसीतील वाहतूक कोंडीचा त्रास दिवसेंदिवस वाढत असल्याची तक्रार कामगारांकडून केली जात आहे. दररोज कामावर ये-जा करताना दीड तासापेक्षा अधिक वेळ वाहतूक कोंडीत जात असल्याने कौटुंबिक जीवनावरही परिणाम होत असल्याचे एका कामगाराने सांगितले. कंपनी स्थलांतरित झाल्यास रोजगार गमावण्याची भीती असून, त्याचा थेट परिणाम कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर होणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले.चाकण परिसरातील रस्त्यांची दुरवस्था आणि वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, वाहतूक कोंडीमुळे उद्योग आणि कामगार दोघांनाही त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी संबंधित कंपन्या आणि कामगारांकडून केली जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनीही चाकण एमआयडीसीतील परिस्थितीवरून सरकारवर टीका केली आहे. चाकण एमआयडीसीची अवस्था अत्यंत खराब झाली असून खड्डे आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. रस्त्यांसाठी ५९ कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले असतानाही खड्डे बुजवले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.चाकण परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे १९ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करत अमोल कोल्हे यांनी या घटनांना जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला आहे. या समस्येबाबत राज्य सरकारला वारंवार पत्र देऊनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. चाकण एमआयडीसीमध्ये मर्सिडीज बेंझ, फॉक्सवॅगन, स्कोडा आणि ह्युंदाईसारख्या जागतिक कंपन्यांचे उद्योग असल्याने या परिसराला मोठे औद्योगिक महत्त्व आहे. अशा परिस्थितीत २० लघुउद्योगांनी स्थलांतराचा निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू केल्याने पायाभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने रस्ते आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न तातडीने सोडवला नाही, तर आणखी उद्योग चाकणबाहेर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.