5 healthy drinks दिवसाची सुरुवात आपण काय खातो किंवा काय पितो, याचा परिणाम दिवसभरातील ऊर्जा आणि आरोग्यावर होत असतो. रात्रीच्या झोपेनंतर शरीराला पाण्यासोबतच आवश्यक पोषक तत्त्वांचीही गरज असते. अशावेळी आरोग्यदायी पेयांचा पर्याय निवडल्यास शरीर हायड्रेटेड राहण्यास आणि दिवसाची सुरुवात ताजेतवाने करण्यास मदत होऊ शकते. जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि इतर आवश्यक पोषक तत्त्वे असलेली ही पेये शरीराचे पोषण करण्यास उपयुक्त ठरू शकतात.
याउलट, अति गोड पेये, शीतपेये किंवा अधिक साखर असलेली पॅकेज्ड सरबते प्यायल्याने शरीरात अतिरिक्त साखर जाऊ शकते. त्याचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे सध्या अनेकजण घरगुती पद्धतीने तयार होणाऱ्या आहाराकडे अधिक लक्ष देताना दिसतात. घरच्या घरी सहज तयार करता येणारी अनेक पेये चव आणि पोषण यांचा चांगला मेळ साधतात. आपल्या आवडीनुसार आणि गरजेनुसार त्यांची निवड करता येऊ शकते. मात्र, कोणतेही पेय घेत असताना संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैली महत्त्वाची आहे.
सकाळची सुरुवात करण्यासाठी कोमट पाणी हा सर्वांत सोपा पर्याय मानला जातो. सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याची पातळी पुन्हा भरून काढण्यास मदत होते. रात्रीच्या झोपेनंतर शरीराला ताजेतवाने करण्यासाठी दिवसाची सुरुवात करण्याचा हा एक सहज मार्ग आहे.
लिंबूपाणी
लिंबूपाणी हाही सकाळच्या वेळेसाठी एक पर्याय ठरू शकतो. एका ग्लास साध्या किंवा कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस मिसळून ते घेता येते. चवीसाठी त्यात थोडा पुदिना घालता येतो. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असल्याने शरीराला पोषण मिळण्यास आणि ताजेतवाने वाटण्यास मदत होऊ शकते.
सत्तूचे पेय
सत्तूचे पेयदेखील सकाळच्या आहारात समाविष्ट करता येते. एका ग्लास थंड किंवा साध्या पाण्यात दोन ते तीन चमचे सत्तू, थोडे भाजलेले जिरेपूड, काळे मीठ आणि लिंबाचा रस मिसळून हे पेय तयार करता येते. सत्तूमध्ये प्रथिने आणि फायबर असल्याने ते अधिक वेळ पोट भरल्यासारखे ठेवण्यास आणि ऊर्जा देण्यास मदत करू शकते.
नारळपाणी
ताजे नारळपाणी हाही सकाळच्या वेळेसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. नारळपाण्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि इतर इलेक्ट्रोलाइट्स असतात. त्यामुळे शरीर हायड्रेटेड आणि ताजेतवाने ठेवण्यास ते मदत करू शकते. विशेषतः उष्ण आणि दमट हवामानात नारळपाणी घेणे फायदेशीर ठरू शकते.
फळे आणि भाज्यांपासून तयार केलेली स्मूदीदेखील नाश्त्यासाठी उपयुक्त ठरू शकते. केळे, सफरचंद, पालक आणि दही किंवा दूध एकत्र ब्लेंड करून स्मूदी तयार करता येते. त्यात इच्छेनुसार चिया सीड्स किंवा अळशीच्या बिया मिसळता येतात. जीवनसत्त्वे, फायबर, प्रथिने आणि खनिजे असलेली ही स्मूदी नाश्त्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते.
दरम्यान, सकाळी रिकाम्या पोटी काही पेये घेणे टाळणेही महत्त्वाचे आहे. जास्त साखर असलेले पॅकेज्ड ज्यूस, शीतपेये, एनर्जी ड्रिंक्स आणि अति गोड शेक्स रिकाम्या पोटी घेऊ नयेत. अशा पेयांमध्ये साखरेचे प्रमाण अधिक, तर आवश्यक पोषक तत्त्वांचे प्रमाण कमी असू शकते. तसेच, रिकाम्या पोटी अति गोड चहा किंवा कॉफी घेतल्याने काही लोकांना पोटात जळजळ किंवा अस्वस्थता जाणवू शकते.
गॅस, आम्लपित्त किंवा अन्य कोणतीही आरोग्य समस्या असल्यास आपल्या आरोग्यस्थितीला अनुकूल असे पेय निवडणे आवश्यक आहे. शरीराला पाणी, ऊर्जा आणि आवश्यक पोषक तत्त्वे मिळतील, अशा पेयाने दिवसाची सुरुवात करण्याचा सल्ला दिला जातो.
डिस्क्लेमर : या लेखात देण्यात आलेली माहिती व उपाय सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. कोणताही उपाय किंवा आहारातील बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.