ए. आर. रहमान यांच्या मुलाचा अपघात

    दिनांक :10-Aug-2026
Total Views |
चेन्नई,
A. R. Rahman's son meets with an accident. प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांचा मुलगा आणि पार्श्वगायक ए. आर. अमीन सोमवारी, १० ऑगस्ट रोजी पहाटे चेन्नईतील गिंडी परिसरात झालेल्या कार अपघातातून थोडक्यात बचावला. ऑलिंपिया टेक पार्क सिग्नलजवळ अमीनच्या कारला एका कॅबने धडक दिली. या घटनेत अमीन आणि त्याचा मित्र किरकोळ जखमी झाले. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे साडेतीनच्या सुमारास अमीन आपल्या मित्रासोबत कारने गिंडीच्या दिशेने जात होता. त्याचवेळी बाजूच्या रस्त्यावरून आलेल्या कॅबने त्यांच्या कारला धडक दिली. धडकेमुळे दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. मात्र, अमीन आणि त्याचा मित्र गंभीर जखमी न झाल्याने मोठा अनर्थ टळला.
 
 
 
ASwerwet
 
अपघातानंतर दोघांना कावेरी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्या किरकोळ जखमांवर उपचार केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, कॅबमधील एका प्रवाशालाही दुखापत झाली होती. त्याला कलाइग्नार सेंटेनरी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यालाही घरी पाठवण्यात आले.या अपघाताची माहिती मिळताच तपास यंत्रणांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. अपघात नेमका कसा घडला, याचा शोध घेण्यासाठी दोन्ही वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. घटनास्थळावरील परिस्थिती आणि अपघाताशी संबंधित इतर बाबींची तपासणी केली जात असून, चौकशीनंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
 
 
ए. आर. अमीन हा पार्श्वगायन क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करत आहे. आपल्या वडिलांचा संगीताचा वारसा पुढे नेत असलेल्या अमीनने अलीकडेच राम चरणच्या ‘पेड्डी’ चित्रपटातील ‘चिकरी चिकिरी’ या गाण्याच्या तमिळ आवृत्तीला आवाज दिला आहे. तसेच जसलीन रॉयल, दुल्कर सलमान आणि मृणाल ठाकूर यांच्यासोबत ‘भीगी भीगी’ या स्वतंत्र गाण्यातही तो सहभागी झाला होता. दरम्यान, ए. आर. रहमान स्वतः अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये व्यस्त आहेत. ‘गांधी टॉक्स’, ‘पेड्डी’ आणि इम्तियाज अली यांच्या ‘आय अॅम बॅक’ या प्रकल्पांसह त्यांच्या आगामी कामांमध्ये दोन भागांतील ‘रामायण’, ‘पार्टिशन १९४७’ तसेच धनुष आणि दिग्दर्शक मारी सेल्वराज यांच्या ‘मूनवॉक’चा समावेश आहे.