नवी दिल्ली,
Abhishek Banerjee's foreign trip तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. डोळ्यांच्या उपचारासाठी सप्टेंबर महिन्यात तीन आठवड्यांसाठी परदेशात जाण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने काही अटी घालत हा निर्णय दिला.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, अभिषेक बॅनर्जी यांना परदेशप्रवास केवळ डिप्लोमॅटिक पासपोर्टच्या माध्यमातून करता येणार आहे. त्यांच्या या प्रवासाची संपूर्ण माहिती तपास यंत्रणांना द्यावी लागणार आहे. यामध्ये परदेशातील वास्तव्याचा पत्ता, उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे नाव, रुग्णालयाची माहिती, उपचारासाठी लागणारा कालावधी आणि विमानप्रवासाची माहिती यांचा समावेश आहे. तपास यंत्रणांनी ही सर्व माहिती गोपनीय ठेवावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

अभिषेक बॅनर्जी यांनी परदेशात उपचार घेण्यासाठी प्रवास करण्याची परवानगी मागितली होती. मात्र, कलकत्ता उच्च न्यायालयाने त्यांची मागणी मान्य केली नव्हती. कथित प्रक्षोभक भाषणाशी संबंधित प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या परदेशप्रवासावरील निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने घेतला होता. या आदेशाला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान शासनाकडून मांडण्यात आलेल्या आक्षेपांवरही चर्चा झाली. मात्र, न्यायालयाने उपचारासाठी परदेशात जाण्याच्या त्यांच्या मागणीला परवानगी दिली. न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांनी सुनावणीदरम्यान प्रत्येक व्यक्तीला परदेशात प्रवास करण्याचा आणि स्वतःच्या उपचाराची पद्धत निवडण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले. हे प्रकरण केवळ एका निवडणूक भाषणाशी संबंधित असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती वेंकिता सुब्रमण्यम मोहन यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण आले होते. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण कलकत्ता उच्च न्यायालयाकडे पाठवले होते. त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती भट्टाचार्य यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची पुन्हा सुनावणी झाली होती. मात्र, उच्च न्यायालयाने अभिषेक बॅनर्जी यांची याचिका फेटाळली. यानंतर डोळ्यांच्या उपचारासाठी परदेशात जाण्याची परवानगी मिळावी यासाठी अभिषेक बॅनर्जी यांनी सर्वोच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सप्टेंबरमध्ये तीन आठवड्यांसाठी परदेशात जाण्यास परवानगी दिली. त्यामुळे उपचाराच्या मुद्द्यावर बॅनर्जी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.