तारामंडळ, कारंजे, साहसी उपक्रमांनी पर्यटक वाढीचे प्रयत्न

‘बॉटनीकल गार्डन’ला भेट देणार्‍यांच्या संख्येत घट

    दिनांक :10-Aug-2026
Total Views |
चंद्रपूर
botanical-garden-chandrapur माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेने आणि पुढाकाराने कोट्यवधी रुपये खर्च करून बल्लारपूर मार्गावर तयार झालेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘बॉटनिकल गार्डन’ सध्या पर्यटकांच्या तुटवड्याचा सामना करीत आहे. या गार्डनच्या विकासातील दुसर्‍या टप्प्यातल्या तारामंडळ, कारंजे आणि साहसी उपक्रमांनी तरी पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल, अशी आशा आता वन विभागाला आहे.

garden 
 
मार्च 2024 मध्ये अत्यंत देखण्या आणि अभ्यासाठीही दर्जेदार असलेल्या ‘बॉटनिकल गार्डन’चे उद्घाटन झाले होते. त्यानंतर 11 जून 2024 पर्यंत, म्हणजेच अवघ्या 73 दिवसांत तब्बल 6 लाख 52 हजार एवढ्या पर्यटकांनी या गार्डनला भेट दिली. अर्थात, दररोज सरासरी 8 हजार 83 पर्यटकांनी बॉटनिकल गार्डन बघितले होते. तर सुटीच्या दिवशी म्हणजे, शनिवार-रविवारला तर सरासरी दररोज 11 हजार 51 इतकी होती. त्या काळात प्रवेश विनामूल्य होते. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश पर्यटकांनी हे गार्डन बघितले. कौतुकही केले. पण आता पर्यटकांनी वानवा आहे. त्यामुळे नव्याने जोडलेल्या काही अभिनव उपक्रमांचा आनंद घेण्यासाठी तरी हे पर्यटक पुन्हा येतील, अशी आशा प्रशासनाला आहे.
 
पूर्वी या गार्डनच्या प्रवेशासाठी 60 रूपये शुल्क होते. ते वाढवून 100 रूपये करण्यात आले. पण तरीही गार्डनच्या देखभालीचा खर्च भागवणे व्यवस्थापनासाठी कठीण झाले आहे. पर्यटकांच्या अल्प प्रतिसादामुळे गार्डनमधील आलिशान असे ‘नावा रेस्टॉरंट’ही बंद पडले आहे. यंदाच्या एप्रिल आणि मे महिन्यात पर्यटकांची संख्या अनुक्रमे 5 हजार 717 आणि 7 हजार 449 इतकीच राहिली. तर 12 जून 2024 नंतर तर केवळ 3 लाख 80 हजार सामान्य पर्यटकांनीच गार्डनला भेट दिली. आता तर सुटीच्या दिवशीही सरासरी दररोज फक्त 1 हजार पर्यटकच येत आहेत.
52 हजार 76 शालेय विद्यार्थ्यांची भेट
पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी व्यवस्थापनाने शालेय विद्यार्थ्यांसाठी योजना सुरू केली. त्याचा लाभही झाला. 52 हजार 76 हजार शालेय विद्यार्थ्यांनी गार्डनला भेट दिली. प्रवेश तिकिटाद्वारे आतापर्यंत 3 लाख 80 हजार 185 पर्यटकांनी, शालेय तिकिटाद्वारे 52 हजार 759 मुलांनी आणि ताडोबासोबत जोडलेल्या ‘कॉम्बो’ तिकिटाद्वारे 256 पर्यटकांनी गार्डनला भेट दिली आहे.