महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी

    दिनांक :10-Aug-2026
Total Views |
मुंबई

buldhana district name महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव आणि अहमदनगरचे अहिल्यानगर असे करण्यात आल्यानंतर आता आणखी एका जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी भाजपच्या महिला आमदाराने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून, बुलढाणा जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊनगर’ करण्याची मागणी केली आहे.
 

buldhana district name change demand to rajmata jijau nagar, mla writes to cm fadnavis 
भाजपच्या महिला आमदार श्वेता महाले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. या मागणीची मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ दखल घेत प्रशासनाला पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचे सांगण्यात आले आहे. राजमाता जिजाऊसाहेबांची जन्मभूमी असलेल्या बुलढाणा जिल्ह्याचा सन्मान तसेच असंख्य शिवप्रेमींच्या भावनांचा आदर करण्यासाठी जिल्ह्याचे नामांतर ‘राजमाता जिजाऊनगर’ करण्यात यावे, अशी भूमिका आमदार महाले यांनी मांडली आहे.
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात बुलढाणा जिल्ह्याच्या ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटनाच्या महत्त्वाचा उल्लेख करण्यात आला आहे. जगप्रसिद्ध लोणार सरोवर, ‘विदर्भाची पंढरी’ म्हणून ओळखले जाणारे आणि संत श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शेगाव, मेहकर येथील श्री शारंगधर बालाजी मंदिर, ज्ञानगंगा अभयारण्य तसेच सैलानी बाबा दर्गा अशा अनेक धार्मिक आणि पर्यटनस्थळांनी बुलढाणा जिल्हा समृद्ध असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या स्थळांना भेट देण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊंचा जन्म झाला, ही जिल्ह्यातील नागरिकांसाठी अभिमानाची बाब असल्याचे आमदार श्वेता महाले यांनी पत्रात नमूद केले आहे. राजमाता जिजाऊसाहेब यांनी बाल शिवबांच्या मनात हिंदवी स्वराज्य स्थापनेचे बीज रोवले. त्यांच्या संस्कारांमुळे महाराष्ट्र आणि देश ७०० वर्षांच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाल्याचा उल्लेखही पत्रात करण्यात आला आहे.राजमाता जिजाऊसाहेबांच्या या योगदानातून उतराई होण्याचा एक प्रयत्न म्हणून बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलून ‘राजमाता जिजाऊनगर’ करण्यात यावे, अशी मागणी आमदार महाले यांनी केली आहे. जगभरातून बुलढाण्यातील पर्यटन आणि धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या माध्यमातून राजमाता जिजाऊसाहेबांचे नाव जगभर पोहोचेल, असा दावा त्यांनी केला आहे.अहिल्यानगरच्या धर्तीवर बुलढाणा जिल्ह्याचे नामांतर करण्याचा निर्णय घेतल्यास देशभरातील समस्त शिवप्रेमींना आनंद होईल, असेही पत्रात म्हटले आहे. शिवप्रेमींच्या भावनांचा आदर करून बुलढाणा जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊनगर’ करण्यात यावे, अशी नम्र विनंती आमदार श्वेता महाले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यामुळे आता बुलढाणा जिल्ह्याच्या नामांतराच्या या मागणीवर सरकारकडून पुढे कोणती भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.