जयपूर,
Burhan trapped in Rajasthan राजस्थानच्या टोंक जिल्ह्यात दहशतवादी संघटनांशी कथित संबंध असल्याच्या संशयावरून एटीएसने दोन तरुणांविरोधात कारवाई केली आहे. जयपूर एटीएस आणि राज्य गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरुवातीला २० वर्षीय बासितला ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार टोंकमधील कार मार्केट परिसरातून बुरहान नावाच्या आणखी एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले. दोघांचेही पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे.बासितला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एटीएसने कार मार्केटमध्ये कारवाई केली. या वेळी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बासित आणि बुरहान हे दोघेही पाकिस्तानातील एका हँडलरच्या संपर्कात असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. या संशयाच्या पार्श्वभूमीवर दोघांची चौकशी करण्यात येत असून त्यांच्या संपर्कांचे आणि हालचालींचे तपशील तपासले जात आहेत.

कारवाईनंतर कोतवाली पोलीस आणि तपास पथकाने बासितच्या घराचीही झडती घेतली. या शोधमोहीमेदरम्यान एटीएम कार्ड, बँक पासबुक तसेच इलेक्ट्रिक स्कूटरचे काही भाग पोलिसांच्या हाती लागले. बासितचे वडील हाफिज यांनी तो धन्नतलाई परिसरात असलेल्या त्यांच्या ढाब्यावर काम करत असल्याचे सांगितले आहे.दरम्यान, राजस्थानमध्ये यापूर्वीही जैश-ए-मोहम्मदशी कथित संबंधांच्या संशयावरून कारवाई करण्यात आली आहे. जून महिन्यात लष्करी गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनंतर राजस्थान एटीएसने जयपूरमधील रहिवासी बबिता धाकड उर्फ खदिजा हिला अटक केली होती. तिचे पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदशी संबंध असल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला होता.
तपासादरम्यान बबिता सोशल मीडिया आणि संदेशवहनाच्या माध्यमातून दहशतवादी संघटनेशी संबंधित व्यक्तींच्या संपर्कात असल्याचे समोर आल्याचा एटीएसचा दावा होता. तिची इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि ऑनलाइन संभाषणांचीही तपासणी करण्यात आली. बहावलपूर येथील मुख्यालयाशी संबंधित असल्याचे सांगितली जाणारी एक व्यक्ती बबितासोबत संवाद साधत होती, अशी माहिती तपासात समोर आली होती. एटीएसच्या तपासानुसार, बबिताचे व्हॉट्सॲप आणि इतर समाजमाध्यमांवरील खाते पाकिस्तानमधून हाताळले जात असल्याचा संशय होता. तसेच तिने आपल्या सिमकार्डचा पासवर्ड पाकिस्तानमधील कथित हँडलरला दिल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला होता. आता टोंकमधील बासित आणि बुरहान यांच्यावरील कारवाईमुळे राजस्थानमधील कथित दहशतवादी नेटवर्कचा तपास आणखी व्यापक होण्याची शक्यता आहे.