गोंदिया,
diarrhea देवरी तालुक्यातील वडेगाव येथे दूषित पाणीपुरवठ्यामुळे अतिसाराची साथ पसरल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या तीन दिवसांत सुमारे ४० जणांना उलटी, जुलाब आदी अतिसाराची लक्षणे आढळून आली असून, सोमवारी १० ऑगस्ट ९ ते १० नवीन रुग्ण आढळल्याची माहिती आहे. दरम्यान, पंचायत समिती सभापती अनिल बिसेन यांच्या पुढाकाराने आरोग्य विभागाच्या पथकाने गावातच कॅम्प लावून रुग्णांची तपासणी व उपचार सुरू केले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

वडेगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. यासाठी गावात तीन बोअरवेल, तीन सौरपंप तसेच नळ योजनांच्या दोन पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत. मात्र, पाण्याच्या टाक्यांची नियमित साफसफाई व देखभाल होत नसल्याने दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. दूषित पाण्याचा वापर केल्यानंतर अनेक ग्रामस्थांना उलटी व जुलाबाचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला काही जणांना ही लक्षणे दिसून आली. मात्र मागील तीन दिवसांत रुग्णांची संख्या वाढत गेल्याने आरोग्य विभागाला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर आरोग्य विभागाने तत्काळ दखल घेत गावात आरोग्य पथक पाठविले. आरोग्य विभागाच्या पथकाने पाणीपुरवठ्याच्या स्रोतांचे तसेच अतिसाराची लक्षणे असलेल्या रुग्णांचे नमुने संकलित करून तपासणीसाठी पाठविले आहेत. गावातच उपचार कॅम्प सुरू करण्यात आला असून, बहुतांश रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यात येत आहे. तीन ते चार रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाण्याच्या टाक्यांची नियमित स्वच्छता व देखभाल न झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा यंत्रणेची तातडीने तपासणी करून पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.
दूषित पाणीपुरवठ्यामुळे वडेगाव येथे अतिसाराचे रुग्ण आढळून आले होते. आरोग्य विभागाच्या वतीने गावात कॅम्प लावून रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
- डॉ. ललित कुकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी, देवरी