गुवाहाटी,
Firing on Assam-Arunachal border आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर जमिनीच्या वादातून हिंसक संघर्ष झाल्याने खळबळ उडाली आहे. धेमाजी जिल्ह्यातील मिंगमांग बस्ती इंटर-स्टेट बॉर्डर परिसरात अरुणाचल प्रदेशातील अज्ञात व्यक्तींनी आसाममधील गावकऱ्यांवर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात आठ जण जखमी झाले असून त्यापैकी सात जणांची प्रकृती गंभीर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.मिंगमांग बस्ती परिसरात आसामच्या हद्दीतील जमिनीवर कथित अतिक्रमण केल्याच्या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद सुरू झाला होता. सुरुवातीला निर्माण झालेला हा वाद पुढे चिघळला आणि त्याचे रूप गोळीबारात झाले. सीमापारून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी आसाममधील नागरिकांना लक्ष्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेत दुर्गेश्वर पातिर, रोहित डोले, नागराज डोले, बिगेश्वर पातिर, पामे पेगु, संजय तयुंग, उत्पल डोले आणि जान डोले हे आठ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने गोगामुख ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी सात जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी धेमाजी सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले.घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. सीमावर्ती परिसरात अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांकडून सतर्कता वाढवण्यात आली आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी या घटनेनंतर दोन्ही राज्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचे सांगितले. दोन्ही राज्यांचे मुख्य सचिव परस्परांशी संपर्कात असून पोलीस महासंचालकांच्या पातळीवरही परिस्थिती शांत करण्यासाठी समन्वय सुरू आहे. आसाम पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.आसामच्या भूमीचे कोणत्याही परिस्थितीत संरक्षण केले जाईल, अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री सरमा यांनी मांडली. आसामची एक इंचही जमीन गमावली जाऊ नये, अशा स्पष्ट सूचना पोलिसांना दिल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी परिस्थिती आणखी चिघळू नये आणि शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आसाम आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातील सीमावाद जुना असून, सीमांकन आणि चर्चेच्या माध्यमातून तो सोडवण्याचे प्रयत्न दोन्ही राज्यांकडून सुरू आहेत. मात्र, काही सीमावर्ती भाग अद्याप संवेदनशील आहेत. मिंगमांग परिसरातील या घटनेमुळे दोन्ही राज्यांमधील तणाव पुन्हा वाढला असून, प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.