जेपीएससी गैरप्रकार प्रकरणात माजी अध्यक्षांना अटक

    दिनांक :10-Aug-2026
Total Views |
रांची,
Former Chairman arrested in JPSC case झारखंड लोकसेवा आयोगाच्या परीक्षा अनियमितता प्रकरणात तपास यंत्रणेने मोठी कारवाई केली आहे. जेपीएससीचे माजी अध्यक्ष एल. खियांगटे यांना सीआयडीने अटक केली आहे. अटकेनंतर तपास पथकाने त्यांना आपल्या कार्यालयात नेले असून, चौकशी पूर्ण झाल्यानंतर सोमवारी संध्याकाळी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. एल. खियांगटे यांची यापूर्वीही सीआयडीकडून अनेक वेळा चौकशी करण्यात आली आहे. २८ जुलैपासून सुरू असलेल्या चौकशीदरम्यान तपास अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून जेपीएससीच्या विविध परीक्षांशी संबंधित अनेक बाबींवर माहिती घेतली होती. आता अटकेनंतर या प्रकरणातील तपासाला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.
 
 

jcb 
 
झारखंड लोकसेवा आयोगाच्या १४ व्या नागरी सेवा परीक्षेसह इतर परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप आहे. ओएमआर शीटमध्ये फेरफार करणे, तसेच पात्रता नसलेल्या उमेदवारांना परीक्षेत उत्तीर्ण करून देण्यासंदर्भातील आरोपांची सीआयडीकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून आयोगाच्या तीन सदस्यांचीही वेगवेगळ्या तारखांना चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये डॉ. अजिता भट्टाचार्य, डॉ. अनिमा हंसदा आणि डॉ. जमाल अहमद यांचा समावेश आहे.एल. खियांगटे यांच्या कार्यालयावर आणि निवासस्थानी सीआयडीने छापे टाकल्यानंतर त्यांनी जेपीएससी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. ते झारखंडचे माजी मुख्य सचिवही राहिले आहेत. त्यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला होता. आता त्याच परीक्षा अनियमितता प्रकरणात त्यांना अटक झाल्याने झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
 
 
सीआयडीच्या तपासात परीक्षा घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या मे. टीएसआर डेटा प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच टीडीपीएलशी संबंधित कथित आर्थिक व्यवहारांचाही तपास करण्यात येत आहे. या प्रकरणात लाचखोरी आणि कमिशनच्या व्यवहारासंदर्भात महत्त्वाची माहिती तपास यंत्रणेच्या हाती लागल्याचा दावा करण्यात आला आहे. टीडीपीएलचे मार्केटिंग मॅनेजर अभय कुमार तिवारी उर्फ मनोज कुमार तिवारी यांनी सीआयडीसमोर दिलेल्या कबुलीजबाबात एल. खियांगटे यांच्याशी संबंधित गंभीर आरोप केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, कंत्राट मिळवून देण्याच्या बदल्यात निवृत्त आयएएस अधिकारी आणि जेपीएससीचे माजी अध्यक्ष एल. खियांगटे यांच्याशी २ कोटी रुपयांचा व्यवहार ठरल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय परीक्षा घेण्याचे कंत्राट मिळाल्यानंतर सर्व देयकांवर एजन्सीला २० टक्के कमिशन देण्याची अट असल्याचेही अभय कुमार तिवारी यांच्या जबाबातून समोर आल्याचे सीआयडी तपासात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे जेपीएससी परीक्षेतील कथित गैरप्रकाराबरोबरच आर्थिक व्यवहारांच्या दिशेनेही तपास पुढे सरकत आहे. आता एल. खियांगटे यांच्या चौकशीतून या संपूर्ण प्रकरणातील आणखी कोणते धागेदोरे समोर येतात, याकडे लक्ष लागले आहे.