गॉल,
Gill fit for Galle Test श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय संघाला कर्णधार शुभमन गिलच्या फिटनेसबाबत दिलासा मिळाला आहे. उजव्या हाताच्या अनामिकेला दुखापत झाल्यामुळे गिल तीन दिवसीय सराव सामन्याच्या पहिल्या दोन दिवसांत मैदानावर उतरला नव्हता. मात्र, तिसऱ्या दिवशी त्याने फलंदाजी करत ४४ धावा केल्या. त्याची ही खेळी पाहता १५ ऑगस्टपासून गॉल येथे सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी तो उपलब्ध राहण्याची शक्यता स्पष्ट झाली आहे.भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. मालिकेपूर्वी भारतीय संघाने श्रीलंका क्रिकेट इलेव्हनविरुद्ध तीन दिवसीय सराव सामना खेळला. या सामन्याआधी गिलच्या अनामिकेला दुखापत झाल्याने त्याच्या पहिल्या कसोटीतील सहभागाबाबत प्रश्न निर्माण झाले होते. मात्र, तिसऱ्या दिवशी त्याने मैदानावर पुनरागमन करून ४४ धावांची खेळी केली आणि आपल्या फिटनेसबाबत सकारात्मक संकेत दिले.
भारतीय संघाचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक साईराज बहुतुले यांनी गिलच्या स्थितीबाबत महत्त्वाची माहिती दिली. गिलला पहिल्या दोन दिवसांत मैदानाबाहेर ठेवण्यामागे कोणतेही गंभीर कारण नव्हते, तर खबरदारी म्हणून त्याला विश्रांती देण्यात आली होती, असे बहुतुले यांनी स्पष्ट केले. गिल सध्या व्यवस्थित असून नियमित सराव करत असल्याचेही त्यांनी सांगितले.गिलच्या फलंदाजीवरून तो कसोटी सामन्यासाठी तयार असल्याचे दिसून येत असल्याचे बहुतुले यांनी नमूद केले. दुखापतीनंतर मैदानात परतताना गिलने कोणतीही मोठी अडचण जाणवू न देता फलंदाजी केली. त्यामुळे संघ व्यवस्थापनाची चिंता बऱ्याच अंशी दूर झाली आहे.
गिलच्या तयारीचे कौतुक करताना बहुतुले यांनी तो प्रत्येक मालिकेकडे अत्यंत गांभीर्याने पाहत असल्याचे सांगितले. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांचा अभ्यास करून त्यानुसार सराव करण्याची त्याची पद्धत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठीही त्याने फिरकी गोलंदाजीचा सामना करण्यावर विशेष भर दिला. संघातील नेट गोलंदाजांसोबत त्याने सातत्याने सराव केला असून, प्रतिस्पर्धी गोलंदाजांकडून मिळणाऱ्या आव्हानासाठी त्याची तयारी सुरू असल्याचे बहुतुले यांनी सांगितले. गिलच्या दुखापतीनंतरचे पुनरागमन आणि प्रशिक्षक बहुतुले यांचे वक्तव्य पाहता भारतीय कर्णधार पहिल्या कसोटीसाठी सज्ज असल्याचे संकेत मिळत आहेत. १५ ऑगस्टपासून गॉल येथे सुरू होणाऱ्या सामन्यात गिलवर कर्णधारपदासोबतच फलंदाज म्हणूनही मोठी जबाबदारी असेल.