जरांगेंच्या भूमिकेवर हाकेंचा हल्लाबोल

    दिनांक :10-Aug-2026
Total Views |
सोलापूर,
Hake attack on Jarange's stance कुणबी समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या दाखल्यावरून महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू करून आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सोलापुरातून त्यांना प्रत्युत्तर दिले. अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर पत्रकार परिषद घेत हाके यांनी जरांगे पाटील यांच्यासह सरकारमधील नेत्यांवरही जोरदार टीका केली.राज्यात ओबीसी आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला असून, आरक्षणाची सद्यस्थिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करावी, अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली. जात पडताळणी समित्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत वापरली जाणारी भाषा ही दहशतीची भाषा असल्याचे सांगत हाके यांनी ओबीसी नेत्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले.
 
 
jarange
 
ओबीसी आरक्षणातील जागांवर मराठा-कुणबी समाजाचा दावा वाढल्यामुळे मूळ ओबीसी समाजाच्या आरक्षणावर परिणाम होत असल्याचा आरोप हाके यांनी केला. कुणबी समाजाचे चार प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील आक्रमक होत असल्याचे सांगत त्यांनी जरांगेंवर निशाणा साधला. मुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्यांवरूनही हाके यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यातील पुरोगामी विचारवंत आणि सामाजिक नेते या मुद्द्यावर गप्प का आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबतही वक्तव्ये केली जात असल्याचा दावा करत हाके यांनी जरांगे यांच्या भाषेवर आक्षेप घेतला. महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या भाषेची परंपरा वेगळी असताना आता सार्वजनिक चर्चेत आक्षेपार्ह भाषा येत असल्याचे त्यांनी म्हटले. मंत्री विखे पाटील आणि उदय सामंत यांच्यासह सत्ताधारी नेते जरांगे यांची वारंवार भेट का घेतात, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
 
 
शिरसाट यांच्याकडे जरांगे यांचे पावणे दोनशे फोन आले असल्याच्या दाव्याचा संदर्भ देत हाके यांनी राजकीय प्रतिनिधित्वाच्या समानतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. प्रत्येक नागरिकाला मतदानाचा समान अधिकार असताना एखाद्या व्यक्तीला विशेष महत्त्व का दिले जात आहे, असा सवाल त्यांनी केला.शिक्षक भरतीच्या मुद्द्यावरूनही लक्ष्मण हाके यांनी सरकारवर टीका केली. शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू असली तरी कटऑफ आणि आरक्षणाच्या गणितामुळे अनेकांना अपेक्षित संधी मिळणार नसल्याचा दावा त्यांनी केला. कोणता रोस्टर लागू केला जात आहे, याबाबत सरकारने स्पष्टता द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरू असल्याचा आरोप करत ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने तातडीने भूमिका स्पष्ट करावी, असे हाके म्हणाले. ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर दलित समाजानेही आपल्यासोबत यावे, असे आवाहन हाके यांनी केले. आज ओबीसी समाजावर परिस्थिती आली आहे, उद्या हीच परिस्थिती इतर समाजांसमोर उभी राहू शकते, असा इशारा देत त्यांनी सामाजिक आरक्षणाच्या प्रश्नावर व्यापक एकजुटीची गरज व्यक्त केली.