मुंबई
rain vidarbha गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला मान्सून आता विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. हवामानातील बदलांमुळे येत्या काही दिवसांत पूर्व महाराष्ट्रातील विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर लक्षणीयरीत्या वाढणार आहे. येत्या १३ ते २० ऑगस्ट दरम्यान विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २० ते २७ ऑगस्ट या दुसऱ्या टप्प्यातही विदर्भातील विविध भागात पावसाची संततधार आणि मध्यम ते मुसळधार सरींचा जोर कायम राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उपसागरात तयार होणाऱ्या या कमी दाबाच्या क्षेत्राचा थेट परिणाम विदर्भ आणि लगतच्या भागातील पावसाच्या हालचालींवर होणार आहे. यामुळे आगामी दिवसांत नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोलीसह संपूर्ण विदर्भात मान्सूनचा जोर वाढणार आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर विदर्भाला लागून असलेल्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह देशातील इतर अनेक राज्यांमध्ये हवामान विभागाने पावसाचा हाय अलर्ट जारी केला आहे.