खगरिया,
Imposter IAS officer arrested बिहारमधील खगरिया जिल्ह्यात जमालपूर बाजारात शनिवारी रात्री पाेलिसांनी ताेतया आयएएस अधिकारी मनीष कुमार गुप्ता यांच्या घरावर छापा टाकला. या कारवाईत १०० काेटींचे साम्राज्य असलेल्या ताेतयाला अटक करुन घरातून विदेशी दारू, हरणाची दाेन शिंगे आणि टेस्ला कार जप्त करण्यात आली़ ही कारवाई पाेलिस अधीक्षक भानू प्रताप सिंग यांच्या निर्देशानुसार करण्यात आली़. पोलिस पथक ताेतया आयएएस अधिकाऱ्याच्या घरी पोहोचले असता त्यांना घराबाहेर दोन वाहने उभी आढळली. एक काळ्या रंगाची टेस्ला इलेक्ट्रिक कार होती आणि दुसरी पांढऱ्या रंगाची सफारी होती. दोन्ही वाहनांवर ’भारत सरकार’ असे लिहिलेले फलक लावलेले हाेते़ चौकशीदरम्यान, मनीषने दोन्ही वाहने आपलीच असल्याचा दावा केला़ परंतु, पाेलिसांनी त्या फलकाबाबत विचारणा केली असता तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. आराेपीकडे सुमारे १०० कोटी रुपयांची मालमत्ता आहे, असा दावा पाेलिसांनी केला आहे.
अजित डोवाल यांचा गुप्तहेर असल्याचा दावा
छाप्यादरम्यान मनीष कुमार गुप्ता घराबाहेर भेटला. त्याने आपण आयएएस अधिकारी असल्याचा दावा केला़ आपल्या मोबाईलवर एक बनावट ओळखपत्र दाखवले, ज्याची प्रिंटआउट पोलिसांनी जप्त केली. त्याने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा गुप्तहेर असल्याचाही दावा केला. परंतु, प्राथमिक पडताळणीत हा दावा खोटा असल्याचे उघड झाले. पथकाने घरातून विविध बँका आणि कंपन्यांची २३ क्रेडिट कार्ड आणि अंदाजे ८ डेबिट कार्ड जप्त केली़ तसेच चार वेगवेगळ्या बँकांची चेकबुक आणि घरात लावलेल्या ११ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे डीव्हीआरही जप्त केले. तसेच घरात सुमारे एक लाख रुपये किमतीची ३१ लिटर महागडी विदेशी दारू आणि पाच ॲपल आयफोनही सापडले.
आर्थिक गुन्हे अन्वेषण पथकाला पाचारण करणार
पाेलिस अधीक्षकांच्या म्हणण्यानुसार, मनीषने लोकांना धमकावून आणि त्यांची फसवणूक करून प्रचंड संपत्ती जमवली आहे. त्याच्याकडे सुमारे १०० कोटी रुपयांची मालमत्ता असू शकते. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी पाटणा येथून आर्थिक गुन्हे अन्वेषण पथकाला पाचारण केले जाईल. याप्रकरणी गोगरी पोलिस ठाण्यात मनीषविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलिस जप्त केलेली कागदपत्रे, कार्ड, वाहने आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. सरकारी ओळखपत्राचा वापर कोणत्या कारणासाठी केला जात होता, हे निश्चित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.