अमरावती
mp-dr-anil-bonde जिल्ह्याचा प्रस्तावित ‘डिफेन्स कॉरिडोअर’मध्ये समावेश करावा आणि अमरावतीला संरक्षण उत्पादन हब म्हणून विकसित करावे, अशी मागणी भाजपाचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.
खासदार बोंडे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, अमरावतीचे भौगोलिक स्थान, रस्ते व रेल्वे कनेक्टिव्हिटी, उपलब्ध जमीन आणि कुशल मनुष्यबळ यामुळे हा परिसर संरक्षण उद्योगासाठी अत्यंत उपयुक्त आहे. अमरावतीत भारत डायनेमिक्स लिमिटेडचा प्रस्तावित मिसाईल निर्माण प्रकल्प लवकरात लवकर सुरू करावा तसेच बीडीएल, डीआरडीओ आणि एचएएल यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे युनिट्स स्थापन करून ‘डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’ तयार करावे, अशी मागणी त्यांनी केली.
या प्रकल्पामुळे विदर्भातील हजारो तरुणांना थेट व अप्रत्यक्ष रोजगार मिळेल आणि एमएसएमई उद्योगांना मोठी चालना मिळेल, असा विश्वास डॉ. बोंडे यांनी व्यक्त केला. यासाठी संरक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चमूने अमरावतीचा दौरा करून पाहणी करावी, अशी विनंतीही त्यांनी केली.