पडिक्कलच्या खेळीने भारताची विजयावर पकड!

    दिनांक :10-Aug-2026
Total Views |
कोलंबो,
India wins thanks to Padikkal's century श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी झालेल्या तीन दिवसीय सराव सामन्यात भारताने श्रीलंका क्रिकेट इलेव्हनचा ६ गडी राखून पराभव केला. ९ ऑगस्ट रोजी झालेल्या या सामन्यात भारताला विजय मिळाला असला तरी त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे पहिल्या कसोटीसाठी संघाची संभाव्य रचना आणि खेळाडूंची तयारी याबाबत अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली. १५ ऑगस्टपासून गॉल येथे सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी संघ व्यवस्थापनाला आता अंतिम संघ निवडताना तुलनेने अधिक स्पष्टता मिळाली आहे.मुळात हा सामना चार दिवसांचा होणार होता. मात्र, अखेरच्या क्षणी त्याचे तीन दिवस करण्यात आले. यानंतरही भारतीय खेळाडूंना परिस्थितीशी जुळवून घेण्याची चांगली संधी मिळाली. यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांच्या योगदानाच्या जोरावर भारताने २०७ धावांचे लक्ष्य सहज पार केले.
 
 
 
India wins thanks to Padikkal
या सामन्यात सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते देवदत्त पडिक्कलने. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने नाबाद १४२ धावांची शानदार खेळी केली. वेगवान आणि फिरकी अशा दोन्ही प्रकारच्या गोलंदाजीचा त्याने आत्मविश्वासाने सामना केला. बचाव करताना संयम दाखवतानाच संधी मिळताच आक्रमक फटके खेळत त्याने संघ व्यवस्थापनाचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे पहिल्या कसोटीत तिसऱ्या क्रमांकासाठी पडिक्कलचा दावा आता अधिक मजबूत झाला आहे.सराव सामन्यापूर्वी भारतीय संघासमोर तंदुरुस्तीचे काही प्रश्न होते. साई सुदर्शनच्या फिटनेसबाबत शंका होती आणि त्याला संपूर्ण कसोटी मालिकेतून वगळण्यात आले. दुसरीकडे, सरावादरम्यान कर्णधार शुभमन गिलच्या उजव्या हाताला दुखापत झाल्याने संघाची चिंता वाढली होती. त्यामुळे तो सामन्याच्या पहिल्या दोन दिवसांत मैदानावर उतरला नव्हता. मात्र, तिसऱ्या दिवशी गिलने नेटमध्ये सराव केला आणि त्यानंतर २०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना डावाची सुरुवात केली. त्याने ४४ धावांची उपयुक्त खेळी करत आपण तंदुरुस्त असल्याचे संकेत दिले. त्यामुळे पहिल्या कसोटीत तो संघाचे नेतृत्व करताना दिसण्याची शक्यता वाढली आहे.
 
 
गोलंदाजीच्या आघाडीवरही भारताला या सामन्यातून महत्त्वाचे संकेत मिळाले. श्रीलंकेच्या परिस्थितीचा विचार करता भारत दोन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. मोहम्मद सिराजचे स्थान जवळपास निश्चित मानले जात असताना दुसऱ्या वेगवान गोलंदाजासाठी प्रसिद्ध कृष्णा आणि गुरनूर ब्रार यांच्यात चुरस आहे. सराव सामन्यात मात्र गुरनूरने आपली बाजू भक्कम केली. त्याने शॉर्ट बॉलचा प्रभावी वापर करत श्रीलंका क्रिकेट इलेव्हनच्या फलंदाजांना अडचणीत आणले. त्याची आक्रमक गोलंदाजी लक्षवेधी ठरली.गुरनूरने केवळ चेंडूनेच नव्हे, तर बॅटनेही आपली क्षमता दाखवली. पहिल्या डावात त्याने अवघ्या १८ चेंडूंमध्ये चार षटकारांच्या मदतीने ३६ धावा फटकावल्या. त्यामुळे दुसऱ्या वेगवान गोलंदाजाच्या निवडीवेळी त्याचा विचार करण्याची शक्यता वाढली आहे. भारताने सामना जिंकला असला तरी ऋषभ पंतची फलंदाजी संघ व्यवस्थापनासाठी चिंतेचा विषय ठरू शकते. दोन्ही डावांत पंतने मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावली. दोन्ही वेळा षटकारासाठी मारलेला फटका सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला. कसोटी क्रिकेटमध्ये भारताच्या महत्त्वाच्या फलंदाजांपैकी एक असलेल्या पंतकडून अधिक जबाबदार फलंदाजीची अपेक्षा आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीपूर्वी त्याच्या फलंदाजीवर संघ व्यवस्थापनाचे विशेष लक्ष राहणार आहे.