कल्याण
dog attacks कल्याण शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत असून, अवघ्या २४ तासांत २०० पेक्षा अधिक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनांमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कल्याण पश्चिमेतील संदीप हॉटेल, रेल्वे स्थानक आणि बस डेपो परिसरात भटक्या कुत्र्यांनी नागरिकांना लक्ष्य केले. याचदरम्यान एका ११ वर्षीय मुलीवर कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली असून, पुढील उपचारांसाठी तिला सायन रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
रविवारी दुपारपासून सोमवारी सकाळपर्यंत २०० पेक्षा अधिक कुत्रा चावलेल्या रुग्णांची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. उपचारासाठी कल्याणच्या रुक्मिणीबाई शासकीय रुग्णालयात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. रविवारी काही जखमींवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले, तर २५ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, ११ वर्षीय मुलीवर झालेला हल्ला गंभीर स्वरूपाचा आहे. कुत्र्याने तिच्या शरीराचे लचके तोडल्याने ती गंभीर जखमी झाली असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक उपचारानंतर तिला पुढील उपचारांसाठी सायन रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
एकीकडे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असतानाच भटक्या कुत्र्यांचे हल्ले सुरूच आहेत. २०० हून अधिक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना ताजी असतानाच, स्टेशन परिसरातील बस डेपो भागात आणखी १० ते १५ जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे कल्याण शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, पालिका प्रशासन नेमके काय करत आहे, असा सवाल जखमी नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी महापालिकेकडून लाखो रुपये खर्च केले जात असल्याचा दावा केला जातो. मात्र, त्यानंतरही शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या आणि त्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढत असल्याचा आरोप होत आहे. भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त केला नाही, तर महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी दिला आहे.
या गंभीर घटनेची दखल घेत महापौर आणि आयुक्तांनी बैल बाजार परिसरातील निर्बीजीकरण केंद्राला भेट दिली. येत्या दोन दिवसांत हे केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. तसेच भटक्या कुत्र्यांची संख्या नेमकी कशी वाढते, याबाबत अभ्यास करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया महापौरांनी दिली.
दरम्यान, वर्षाला सुमारे १८ हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणे गरजेचे असताना त्यासाठी केंद्राकडे आवश्यक क्षमता नव्हती. आता ही क्षमता वाढवण्यात आली असून, संबंधित एजन्सीला दररोज ४० ते ५० ऑपरेशन करण्याचे लक्ष्य दिले जाईल, अशी माहिती आयुक्तांनी दिली.
मात्र, कुत्र्यांच्या हल्ल्यांतील जखमींच्या संख्येवरूनही प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काल १०० ते १५० लोकांना कुत्र्यांनी चावा घेतलेला नसून, एका परिसरात १२ ते १५ जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती आयुक्तांनी दिली. दुसरीकडे, डॉक्टरांनी स्वतः १३० जणांचा आकडा सांगितला होता. त्यामुळे प्रशासनाकडून हल्ल्यांची नेमकी संख्या लपवली जात आहे का, असा संशय व्यक्त केला जात आहे. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे आता महापालिका प्रशासनासमोर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीरपणे उभा राहिला आहे.