मुंबई
maharashtra weather update राज्यातील हवामानात पुन्हा बदल होताना दिसत असून, काही भागांत पावसाने उघडीप दिली असली तरी अनेक ठिकाणी अद्याप पावसाची हजेरी कायम आहे. भारतीय हवामान विभागाने पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, त्यानंतरही राज्याच्या काही भागांत पाऊस कोसळत आहे. आजही काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक, पुणे, अकोला, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील काही भागांत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र आहे. मात्र, काही ठिकाणी अजूनही पावसाच्या सरी सुरूच आहेत.ठाणे, मुंबई, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी आज कोणताही पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. त्यामुळे या भागात सध्या पावसापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
नाशिकच्या घाटमाथ्यावर मात्र पावसासह वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. घाटमाथ्यावर ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, त्यासोबत पाऊस होण्याचा अंदाज आहे. जळगाव जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.दरम्यान, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांसाठी भारतीय हवामान विभागाकडून कोणताही पावसाचा अलर्ट देण्यात आलेला नाही. राज्यात सध्या काही भागांत पावसाची उघडीप असली तरी पुढील दोन ते तीन दिवसांत पुन्हा एकदा पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या पावसाने विश्रांती घेतलेल्या भागांमध्ये आगामी दिवसांत हवामानात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे.