मुंबई
manoj jarange patil कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी देण्यात आलेले आदेश तातडीने मागे घ्यावेत आणि झालेली चूक दुरुस्त करावी, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा केली आहे. ‘‘अजूनही वेळ गेलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्याची चूक मान्य करून ती दुरुस्त करावी. अन्यथा यापेक्षाही मोठे आंदोलन करणार,’’ असा थेट इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. सांगली दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.
मनोज जरांगे पाटील सध्या राज्याच्या दौऱ्यावर असून, विविध जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाशी संवाद साधत आहेत. आगामी २९ ऑगस्ट रोजी निर्णायक आंदोलन छेडण्याची घोषणा त्यांनी केली असून, त्या पार्श्वभूमीवर त्यांचे राज्यभर दौरे सुरू आहेत. सांगलीत आल्यानंतर त्यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली.कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्रांबाबत बावनकुळे यांनी घेतलेल्या भूमिकेवर आक्षेप घेत जरांगे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे चूक दुरुस्त करण्याची मागणी केली. ‘‘कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी दिलेले आदेश मागे घ्या. झालेली चूक दुरुस्त करा. अजूनही वेळ गेलेली नाही. मुख्यमंत्र्यांना पुन्हा आवाहन करतो की, आपल्या मंत्र्याची चूक मान्य करा,’’ असे ते म्हणाले.बावनकुळे यांनी नोंदणी अवैध करण्यासंदर्भात निर्देश दिल्याचा आरोप करत जरांगे यांनी त्यावरही प्रश्न उपस्थित केले. संबंधित पत्रातील सांकेतिक भाषेचा संदर्भ देताना, मंत्र्यांच्या ओएसडी आणि पीएसकडून आपल्याला याबाबत माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पत्रातील ‘अ’ या उल्लेखाचा अर्थ संबंधित मागणीला प्रथम प्राधान्य देणे असा असल्याचेही त्यांनी नमूद केले.‘‘अधिकाऱ्याने काय कारवाई केली, त्याचा प्रस्ताव पाठवायचा असतो. तुम्ही हस्तक्षेप करत नाही, तर मग प्रस्ताव का मागितला? त्वरीत प्रस्ताव का मागवला? अवैध करून प्रस्ताव मागितला आहे. तुम्ही कितीही स्पष्टीकरण द्या, तुम्ही चुकले आहात,’’ असा आरोप जरांगे यांनी केला.
ही चूक तातडीने दुरुस्त न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. ‘‘तुम्ही संपून जाल आणि तुमच्या पक्षाची वाट लागू शकते. मुख्यमंत्र्यांनी अजूनही आमच्या मंत्र्याने चूक झाल्याचे सांगून चूक दुरुस्त करावी. वेळ गेलेली नाही. चूक दुरुस्त करू नये आणि मराठ्यांचे वाटोळे करावे, मग त्यांना कळेल. मी खूप ताकदीचे आंदोलन करणार आहे. सुट्टीच नाही. त्यामुळे चूक दुरुस्त करा,’’ असे जरांगे म्हणाले.
दरम्यान, सरकार जातपडताळणी समितीच्या कामात हस्तक्षेप करत नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांसमोर सांगितले होते. सरकारला त्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसून, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काम सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. याच मुद्द्यावरून जरांगे यांनी सरकारला सवाल केला.
‘‘बावनकुळेंना कोर्टाने इंडोसमेंट करण्याचे अधिकार दिले आहेत का? किती वेड्यात काढणार आहात? हा सरकारचा हस्तक्षेप नाही का? मग बावनकुळेंचे पत्र काय आहे? हस्तक्षेप नाही का?’’ असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये
मराठा समाज पेटून उठला असून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, अशी आपली इच्छा असल्याचेही जरांगे यांनी सांगितले. मराठा समाजावर अन्याय होऊ नये, अशी भूमिका मांडत त्यांनी बावनकुळे यांच्यावर मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा आरोप केला. ‘‘मंत्रिपदाचा गैरवापर करून जाणूनबुजून हेच केले आहे. बावनकुळेंनी मराठा समाजावर अन्याय केला आहे. सरकार नवनवे डाव शोधत आहे,’’ असा आरोप त्यांनी केला.मराठा समाजाच्या नोंदी रद्द केल्या जात असल्याचा दावा करताना जरांगे यांनी नोंदींमधील किरकोळ चुका दाखवून प्रमाणपत्रे रद्द करण्यावरही आक्षेप घेतला. कुठे ‘कुणबा’ लिहिले आहे, कुठे पेनाने किंवा शाईने लिहिले आहे, तर कुठे हस्ताक्षरात बदल असल्याचे कारण दिले जात असल्याचे त्यांनी म्हटले.
तलाठी दरवर्षी बदलत असल्याने नोंदींमधील हस्ताक्षर बदलणे स्वाभाविक असल्याचे सांगत जरांगे यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘‘गावात आलेले तलाठी बदलले की नाही? दरवर्षी तलाठी बदलतो. अक्षर बदलतात. एकच तलाठी ५०-५० वर्षे एकाच गावात राहतो का? बावनकुळे काहीतरी बहाणे करत आहेत. बावनकुळेंना काही अक्कल आहे का, मला कळत नाही,’’ अशा शब्दांत त्यांनी महसूलमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला.