पुणे
delivery boy एका बाजूला पार्सल पोहोचवण्याचे काम करणारा डिलिव्हरी बॉय आणि दुसऱ्या बाजूला कोट्यवधी रुपयांच्या सायबर फसवणुकीच्या रॅकेटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारा आरोपी, अशी धक्कादायक घटना मुंबई आणि पुण्यात उघडकीस आली आहे. सायबर गुन्हेगारांकडून होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक हेराफेरीचा तपास करत असताना खार पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले असून, त्यातून एका २५ वर्षीय डिलिव्हरी बॉयने सायबर फसवणुकीच्या पैशांतून पुण्यात तब्बल ४८ लाख रुपयांचा फ्लॅट खरेदी केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश खरात (वय २५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अविनाश खरात आणि त्याचा फरार साथीदार विकास भुजबळ या दोघांनी मिळून स्वतःच्या तसेच इतर व्यक्तींच्या नावावर तब्बल २२ बनावट बँक खाती उघडली होती. सायबर भामट्यांनी लोकांची फसवणूक करून मिळवलेले तब्बल ७ कोटी ४२ लाख रुपये या खात्यांमध्ये जमा झाल्याचे तपासात आढळून आले आहे. याच रकमेतील मोठ्या वाट्यातून अविनाशने पुण्याच्या हद्दीत ४८ लाख रुपयांचा फ्लॅट खरेदी केला होता.
पोलिसांना संशय आहे की, या संपूर्ण रॅकेटची सूत्रे राजस्थानमधील एका मोठ्या सायबर टोळीच्या हातात आहेत. या टोळीकडून टेलिग्रामच्या माध्यमातून नागरिकांना ‘वर्क फ्रॉम होम’ आणि पार्ट टाइम टास्कचे आमिष दाखवले जात होते. त्यानंतर विविध टास्कच्या नावाखाली त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले जात होते. या फसवणुकीतून मिळालेल्या पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी अविनाश खरात आणि विकास भुजबळ यांच्यासारखे आरोपी बँक खाती उपलब्ध करून देत असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
या महाघोटाळ्याचा पर्दाफाश ४.०७ लाख रुपयांच्या ऑनलाइन टास्क फ्रॉडच्या तक्रारीनंतर झाला. संबंधित पीडित व्यक्तीला टेलिग्रामवर टास्क पूर्ण करण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून ४.०७ लाख रुपये उकळण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास करताना खार पोलिसांनी सायबर हेल्पलाइन १९३० आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे शोधले. या तपासातून अखेर अविनाश खरातपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले आणि त्याला अटक करण्यात आली.तपासादरम्यान अविनाश खरातच्या नावावर तब्बल १३ बँक खाती, तर त्याचा साथीदार विकास भुजबळच्या नावावर नऊ बँक खाती आढळून आली आहेत. या सर्व खात्यांचा वापर सायबर फसवणुकीतून मिळालेल्या पैशांच्या व्यवहारांसाठी करण्यात आल्याचा संशय आहे. विकास भुजबळ सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.या संपूर्ण नेटवर्कचे मूळ शोधण्यासाठी खार पोलिसांचे विशेष पथक आता राजस्थान पोलिसांच्या संपर्कात आहे. या तपासातून सायबर फसवणुकीच्या या रॅकेटशी संबंधित आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.