मुथूट फिनकॉर्पचा अपहार ४.६० कोटींच्या घरात

आतापर्यंत ७१ तक्रारी दाखल, तीन आरोपींच्या कोठडीत वाढ

    दिनांक :10-Aug-2026
Total Views |
अमरावती
muthoot-fincorp येथील मुथूट फिनकॉर्पचा शाखा व्यवस्थापक शुभम वासेवाय याच्या फसवणूक व गैरकारभार या प्रकरणातील तक्रारदारांची संख्या ७१ झाली असून, त्या तक्रारीनुसार प्राथमिकदृष्ट्या अपहार केलेले सोने २ किलो ८१९ ग्रॅम, तसेच ५१ लाख रुपये रोख असा एकूण अपहार ४ कोटी ५९ लाख रुपयांच्या घरात पोहोचला आहे. सोमवारी शुभम व अन्य दोन आरोपींच्या पोलिस कोठडीत १३ ऑगस्टपर्यंत वाढ झाली आहे.

muthut 
 
 
शुभम वासेवाय याने शाखेत सोने तारण ठेवून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांपैकी अनेकांना कर्जाची रक्कम दिली. मात्र, तारण असलेल्या सोन्यांपैकी काही सोने स्वतः व अन्य दोन सहकर्मचाऱ्यांच्या मदतीने सोनार किंवा अन्य बँकेत तारण ठेवले व त्यावर कर्ज रक्कम उचलली. दरम्यान, सुरुवातीला हा प्रकार ग्राहकांच्या किंवा बँकेच्या लक्षात आला नाही. मात्र, मागील आठ दिवसांपूर्वी काही ग्राहक तारण ठेवलेले सोने सोडवण्यासाठी गेले. त्यांनी सोन्यावरील घेतलेल्या कर्जाची व्याजासह परतफेड केली होती. मात्र, त्यांना सोने परत मिळाले नाही. त्यामुळे तारण ठेवलेले सोने आणि त्यांनी भरलेली त्याबदल्याची रक्कम, अशा दोन्ही बाजूंनी ग्राहकांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला. सुरुवातीला एका महिला ग्राहकाने कोतवाली पोलिस ठाण्यात आठ दिवसांपूर्वी तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरून शुभम वासेवायविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. तपासात पोलिसांनी शुभमसह त्याचे सहकारी धीरज सिरसाट व सुरज खेरकर यांनाही अटक केली आहे. मागील आठ दिवसांपासून दररोज ग्राहकांच्या तक्रारी येत आहेत. शाखेतील महिला खजीनदाराला अटकपूर्व जामीन मिळाल्याची माहिती आहे.
४४८ पावत्या, ३० एटीएमकार्ड जप्त
पोलिसांनी शुभमच्या घरी व त्याच्या कारची झडती घेतली असता, तारणाच्या वेगवेगळ्या ४४८ पावत्या सापडल्या आहेत. त्या पावत्यांचा पोलिस तपास करत आहेत. याचवेळी शुभम व धिरजची प्रत्येकी एक कार अशा दोन कारसुद्धा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. शुभमने या रकमेतून काही मालमत्ता खरेदी केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिसांनी तीन शेतांचे खरेदीखत तसेच तीन प्लॉटचे खरेदीखत चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे एकूण सहा बँक खाती असून, वेगवेगळे ३० एटीएम कार्डसुध्दा पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केले आहेत.