रुग्णवाहिकेची दोन तास प्रतीक्षा... सात महिन्यांच्या गर्भवतीचा मृत्यू

पाच जणांविरोधात गुन्हा

    दिनांक :10-Aug-2026
Total Views |
परभणी
parbhani pregnant woman परभणीत सात महिन्यांच्या गर्भवती महिलेची प्रकृती अचानक बिघडल्यानंतर तिला पुढील उपचारांसाठी नांदेडला हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र, १०८ रुग्णवाहिकेसाठी एकदा नव्हे, तर तब्बल सात वेळा संपर्क करूनही दोन तासांहून अधिक काळ रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. अखेर या गर्भवती महिलेचा आणि तिच्या पोटातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परभणीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात ८ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
 

parbhani pregnant woman 
 
 पोटातील बाळाचा मृत्यू
 
 
जिंतूर येथील साठेनगरातील नेवाती मोहल्ला परिसरात राहणारे शेख अमीन शेख अयुब यांच्या पत्नी मर्जीनाबी अमीन शेख या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या. ८ ऑगस्ट रोजी त्यांचा रक्तदाब अचानक कमी झाल्याने त्यांना उपचारासाठी परभणीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना नांदेडला हलवण्याचा सल्ला रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला.त्यानंतर मर्जीनाबी यांच्या पतीने १०८ रुग्णवाहिका हेल्पलाइनवर सात वेळा संपर्क केला. मात्र, दोन तासांहून अधिक वेळ उलटूनही रुग्णवाहिका रुग्णालयात पोहोचली नसल्याचा आरोप आहे. या विलंबानंतर मर्जीनाबी आणि त्यांच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला.या प्रकरणी मर्जीनाबी यांच्या पतीच्या फिर्यादीवरून रुग्णवाहिका चालक, त्यावरील डॉक्टर तसेच परभणीच्या स्त्री रुग्णालयातील डॉक्टरांसह पाच जणांविरोधात रविवारी पहाटे कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
रोहित पवारांची टीका
दरम्यान, या घटनेनंतर १०८ रुग्णवाहिका सेवेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. रुग्णवाहिकेसाठी नेमका किती वाजता फोन करण्यात आला, कॉल नेमका किती वाजता स्वीकारण्यात आला, त्यावेळी उपलब्ध रुग्णवाहिका नेमकी कुठे होती आणि रुग्णालयात रुग्णवाहिका पोहोचण्यास नेमका विलंब का झाला, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची मागणी होत आहे. या सर्व बाबींची चौकशी झाल्यानंतरच विलंबाचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्यातील १०८ रुग्णवाहिकेसाठी सात वेळा फोन करूनही दोन तास प्रतीक्षा करावी लागली आणि अखेर सात महिन्यांच्या गर्भवती महिलेसह तिच्या बाळाचा मृत्यू झाला, ही बाब अत्यंत संतापजनक असल्याची टीका त्यांनी केली.“सामान्य माणसाच्या जीवाची शासकीय यंत्रणेला काहीच किंमत नाही का?” असा सवाल रोहित पवार parbhani pregnant woman यांनी केला आहे. राज्याचे ‘इन्फ्रामॅन’ म्हणून मिरवणाऱ्यांना आरोग्य व्यवस्थेची ही वेशीवर टांगलेली लक्तरे दिसत नाहीत का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राज्याची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असताना सरकार गाढ झोपेत आहे, हे चीड आणणारे असल्याचे रोहित पवार यांनी समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
 
या घटनेमुळे १०८ रुग्णवाहिका सेवा, तिची उपलब्धता आणि आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत वैद्यकीय मदत मिळण्याच्या व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकरणातील तपासातून रुग्णवाहिका उपलब्ध होण्यास नेमका विलंब कशामुळे झाला आणि त्यासाठी कोणाची जबाबदारी होती, हे स्पष्ट होणे महत्त्वाचे ठरणार आहे.